Indapur Crime News : बार्शीमधील फटे प्रकरण ताजे असतानाच इंदापूर शहरातील एक फसवणूकीचं प्रकरण समोर आले आहे. इंदापूरमध्ये भिशीच्या नावाखाली 5 कोटी 88 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी इंदापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  उषाप्पा मारुती बंडगर,  शंकर मारुती बंडगर, उत्‍तम मारुती बंडगर, नारायण सायबु वाघमोडे व परशुराम मारुती वाघमोडे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  हा घोटाळा 30 कोटीपर्यंतचा  असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर शहरांमध्ये याहून अधिक  गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत संदीप चित्तरंजन पाटील यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप चित्तरंजन पाटील हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांची उषाप्पा मारुती बंडगर, शंकर मारुती बंडगर, उत्‍तम मारुती बंडगर, नारायण सायबु वाघमोडे व परशुराम मारुती वाघमोडे (सर्व राहणार इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे) यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते.  या पाच जणांनी एकत्र गट करून भिशीच्या योजनेची कल्पना आखली व रोख स्वरुपात आर्थिक गुंतवणुकीतून पैसा गोळा केला. इंदापूर शहर व आजूबाजूच्या परिसरात कमी किमतीत जागा खरेदी केली. हीच जागा नंतर जास्त किमतीत विकून आर्थिक नफा कमावला. वरील पाच जणांनी संदीप पाटील यांना जमीन खरेदी विक्री व्यवसायात स्वरूपात रोख रक्कम गुंतवणूक करण्याचे व पैसे दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले.


सन 2015 ते 2019 च्या दरम्यान जमीन खरेदीसाठी भिशीच्या स्वरूपात 85 लाख रुपये रोख स्वरूपात पाटील यांनी दिले. त्यानंतर या पाच जणांनी मोक्याच्या ठिकाणी जागा खरेदी केल्याचे सातबारा उतारे दाखवले. ही जागा विकून 85 लाख रुपयांची रक्कम दामदुप्पट मिळाल्याने संदीप पाटील यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.  त्यानंतर संदीप पाटील यांनी वेळोवेळी त्यांना पैसे दिले. त्यांच्याप्रमाणेच इंदापूर शहरातील संदीप पाटील यांचा भाऊ गणेश मेघशाम पाटील यांच्याकडून 75 लाख रुपये, नामदेव विठ्ठल ताठे यांच्याकडून 90 लाख रुपये, मोहन दिगंबर गाडे यांच्या कडून 60 लाख रुपये, मेहबूब हमाम शेख यांच्याकडून वीस लाख रुपये, गोपीचंद विठ्ठल गलांडे यांच्याकडून 18 लाख रुपये, अल्ताफ शेख यांच्याकडून 55 लाख रुपये, तन्मय नरेंद्रकुमार गांधी यांच्याकडून 35 लाख रुपये, नरेंद्र तेजराम गांधी यांच्याकडून 35 लाख रुपये, संभाजी सोपान नरूटे यांच्या कडून 55 लाख रुपये, लक्ष्‍मण बाबुराव रेडके यांच्याकडून 60 लाख रुपये अशी रक्कम वेळोवेळी भिशीच्या स्वरूपात या पाच जणांनी गोळा केली.


 भिशी चालकांनी स्वतःच्या नावाने तसेच त्यांच्या नातेवाईक व मित्रांचे नावाने इंदापूर शहर व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मोक्याच्या ठिकाणी जागा घेतल्या व आर्थिक व्यवहार केले. मात्र त्यानंतर रकमेचा परतावा केला नाही. 2020 मध्ये कोरोनाचे कारण सांगून थोडे थांबा, आम्ही तुमचे पैसे देतो असे सांगून टाळाटाळ केली. ते पैशाची चालढकल करून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पैशाचा अपहार केल्याचा संशय पाटील यांना आला. त्यावरून 5 कोटी 88 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पाटील यांनी इंदापूर पोलिसांकडे केली. त्यावरून इंदापूर पोलिसांनी वरील पाच जणांविरोधात 5 कोटी 88 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान बार्शी येथील विशाल फटे याने शेकडो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण ताजे असतानाच इंदापूर सारख्या ग्रामीण भागात देखील कोट्यावधी रुपयांच्या भिशी घोटाळ्याची व्याप्ती समोर आली आहे. भिशी चालकांनी कोट्यावधी रुपये, जमा करून लोकांना गंडा घातल्याचे समोर आले असून यासंदर्भात इंदापूरच्या गुंतवणूकदारांनी थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.