पुणे: राज्याच्या काही भागामध्ये ऑक्टोबर हिटचा (october heat) परिणाम जाणवू लागला आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. राज्यात ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण निर्माण झाल्याने दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत आहे. अशातच  राज्यात आज आणि उद्या (शनिवार व रविवारी) राज्यातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज (Rain Update) हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. 


परतीचा मान्सून (Rain Update) उत्तर भारतातून वेगाने पुढे महाराष्ट्रात आला आहे. पंरतू, तो नंदूरबारमध्येच अडखळला आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि उकाडा असे वातावरण तयार झाले आहे. शनिवार आणि रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाचा (Rain Update) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


त्याचबरोबर आजपासून (12 ऑक्टोबरपासून) पुढील 5 दिवस म्हणजे 16 ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर अशा 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Rain Update)  वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस पुन्हा राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. 


विजांच्या कडकडाटांसह शुक्रवारी बरसल्या सरी


पुणे शहरात काल (शुक्रवारी दि. 11) रात्री सात वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांमध्ये दुपारी ऊन आणि संध्याकाळी  पाऊस असं संमिश्र वातावरण दिसून येत होतं. शुक्रवारी अचानक विजांच्या कडकडाटांसह शहर परिसरात सरी कोसळल्या. राज्यामध्ये एकीकडे परतीच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत, तर दुसरीकडे 'ऑक्टोबर हीट' (october heat) जाणवत आहे. शुक्रवारी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी बरसल्या. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्यामुळे राज्यात शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. पुढील 3 ते 5 दिवस राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.


या भागात यलो अलर्ट जारी


पालघर (12,13), ठाणे (12,13), रायगड (12,13), रत्नागिरी (12,13), धुळे (12,13), नंदूरबार (12,13), धुळे (12,13), नाशिक (12,13), पुणे (12,13), छत्रपती संभाजीनगर (12,13), कोल्हापूर (12,13), सातारा (12), जालना (12), बीड (12), अकोला (12), अमरावती (12), बुलडाणा (12,13), वर्धा (12,13), वाशिम (12,13), यवतमाळ (12,13)