मुंबई : मुंबईहून पुणे गाठण्यासाठी रस्ता किंवा रेल्वेमार्गाने किमान तीन तास लागतातच. जवळपास दीडशे किलोमीटरचं हे अंतर भविष्यात अवघ्या 14 मिनिटांत कापता येणार आहे. पुणे-मुंबई हायपरलूप कॉरिडोरसाठी अमेरिकास्थित व्हर्जिन हायपरलूप कंपनीने तपशीलवार प्रकल्प अहवाल सादर केला आहे.
राज्य सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली, तर 2026 पर्यंत हा प्रोजेक्ट कार्यरत होईल, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुणे-मुंबई हायपरलूप कॉरिडोर व्यवहार्य असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. 'मॅन्गेटिक महाराष्ट्र' प्रदर्शनात हा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे.
मुंबई ते पुणे अंतर कापण्यासाठी रस्ते किंवा रेल्वे मार्गाने किमान तीन तासांचा कालावधी लागतो. मात्र पुणे-मुंबई हायपरलूप कॉरिडोर प्रत्यक्षात अवतरल्यास हे अंतर भविष्यात अवघ्या 14 मिनिटांत पार करता येईल. या प्रकल्पाचं मूल्यांकन करण्यासाठी व्हर्जिन हायपरलूप वन (व्हीएचओ) सोबत राज्य सरकारने करार केला आहे.
प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी कॅलिफोर्नियात व्हर्जिन हायपरलूप कंपनीची स्थापना केली.
मुंबईत हायपरलूप स्थानक उभारण्यासाठी दादर, सांताक्रुझ किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तीन पर्याय देण्यात आले आहेत.
हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम काय आहे?
दोन शहरांना जोडणाऱ्या भव्य ट्यूब्स बांधल्या जातात. (एक मुंबईकडे जाणारी, तर पुण्याच्या दिशेने) ट्रेनप्रमाणे स्पेशल कम्पार्टमेंट एका दिशेने दुसरीकडे प्रवास करतात.
ठराविक अंतराने असलेल्या मॅग्नेटिक अॅक्सलरेटर्समुळे हे कम्पार्टमेंट पुढे सरकत राहतील. कम्पार्टमेंट भोवती हवेचा कमी दाब तयार करुन वेग वाढवला जाईल.
प्रवाशांची वाहतूक करताना त्यांचा वेग ताशी 700 मैल म्हणजे अंदाजे 1100 किलोमीटर इतका ठेवण्याचा अंदाज आहे. प्रत्यक्षात याच्या निम्म्या वेगाने प्रवास झाला, तरी दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ प्रचंड प्रमाणात वाचेल.
मुंबईत पीक अवर्समधील ट्राफिक पाहता या वेळेत वांद्र्याहून सांताक्रुझ गाठायला जितका वेळ लागेल, तितकाच वेळ सांताक्रुझहून पुणे गाठायला लागू शकतो.