पुणे : पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचं एकमेव साधन म्हणजे पीएमपीएमएलच्या बसेस. पण लॉकडाऊनमध्ये बंद असलेली ही सेवा 3 सप्टेंबरपासून सुरु झाली खरी. पण पीएमपीएमएलची आर्थिक घडी पुर्णपणे मोडली आहे. कायम कर्मचाऱ्यांचा पगार कसा द्यायचा हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.


लॉकडाऊनमुळे तिजोरीला बसलेला आर्थिक फटका, सध्या कमी क्षमतेनं सुरु असलेली प्रवासी वाहतूक आणि पालिकांकडे अडकलेली थकबाकी यामुळे पीएमपीएमएलची बिकट अवस्था झाली आहे. पीएमपीएमएलचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र जगताप यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर कायम कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीही पैसे नाहीयेत.


प्रवासी संख्या वाढतेय पण..
एबीपी माझाशी बोलताना राजेंद्र जगताप म्हणाले की, “पुणे शहरात 3 सप्टेंबरला आपण बससेवा सुरु केली. संपुर्ण क्षमतेच्या 25 टक्के म्हणजे 425 बसेस आम्ही रस्त्यावर आणल्या. ज्या ज्या ठिकाणी प्रवासी संख्या वाढताना दिसली आणि जिथे पीक टाईममध्ये गर्दी होते तिथे बसेस वाढवल्या. 22 सप्टेंबरपर्यंत बसेसची संख्या 462 पर्यंत गेली आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. नियामांचे पालन करत आहेत. पहिल्या दिवशी प्रवासी संख्या 62 हजार होती. ही संख्या आता 1 लाख 51 हजारांच्या पुढे गेली आहे. दिवसेंदिवस संख्या वाढते आहे. बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवत आहोत.”

पुण्याच्या जम्बो कोविड रुग्णालयातून 33 वर्षीय कोरोनाबाधित महिला गायब


पुढे बोलताना राजेंद्र जगताप यांनी सांगितलं की, “बसच्या एकुण प्रवासी वाहतुक क्षमतेच्या फक्त 30 टक्के प्रवासी आम्ही घेत आहोत. हळूहळू बसेसची संख्या वाढवतो आहोत. अशी आशा आहे की 15 ऑक्टोबरपर्यंत ही संख्या 50 टक्क्यांपर्यंत जाईल. लॉकडाऊनमध्ये दरदरोज दीड कोटींचं नुकसान झालं. यादरम्यान एकूण 200 कोटींचं नुकसान पीएमपीएमएलला सोसावं लागलं. 31 ऑगस्ट अखेर 183 कोटींची संचलनाची तुट आहे. संचलनाची तूट पालिकेनं देणं अपेक्षित आहे. या काळामध्ये दररोज 250 ते 300 बसेस आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दिल्या. त्याचसोबत जे रेल्वे किंवा विमानानं जाणारे प्रवासी बोहर जाणाऱ्या किंवा येणाऱ्या प्रवाशांना दिली. त्याचसोबत सुमारे 4500 हजार पीएमपीएमएलचे कर्मचारी हे पालिके अंतर्गत कोविडच्या ड्यूटीवर कार्यरत होते. या सेवा आम्ही त्यांना दिली. पण त्याचे पैसे सुद्धा आम्हाला दिलेले नाहीत. कोरोनाच्या काळात बोर्डाने खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला. आज अशी परिस्थिती आहे की जर चालू महिन्यात आमच्याच कायम कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा असेल तर त्यासाठीही पैसे नाहीत. फ्यूएलचे(एमएनजीएलचे) जवळपास 38 कोटी देणं बाकी आहेत. डिझेल करता पैसे नाहीत.”


महापालिकांकडून मदतीची अपेक्षा
अशा परिस्थितीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांकडून मिळणाऱ्या मदतीची अपेक्षा पीएमपीएमएलला आहे. पण कोरोनाच्या काळात पालिकांच्या तिजोऱ्यांवर अधिकचा भार आल्याने ठरल्याप्रमाणे मदत कशी करणार असा प्रश्न पालिकेकडून उपस्थित केला गेला. पुणे पालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी माहीती दिली. हेमंत रासने म्हणाले की, “दरवर्षी महापालिकेकडून तूट दिलीच जाते. मागच्या सहा महिन्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीएमएलची सेवा सुरु होती. त्याचं बील त्यांनी पालिकेला पाठवलं असं म्हणतात. ते मी बघतो. पण मागच्या सहा महिन्यात पालिकेला अपेक्षित असलेलं उत्पन्न मिळालं नाही. या परिस्थितीमध्ये पालिकेवर खूप ताण आला. पालिकेला कोणीही मदत केली नाही. पालिकेवर खर्चाचा अतिरिक्त ताण आहे. त्या तुलनेमध्ये उत्पन्न येत नाही.”


तर दुसरीकडे प्रवासी संख्या वाढत असल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी कर्मचारी युनियनकडून केली जातेय. अनलॉकमुळे प्रवासी संख्या वाढतेय. पण तेवढ्या प्रमाणात बस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना वाट पाहत ताटकळत ऊभे राहवं लागतंय.

पीएमपीएमएलच्या विस्कटलेल्या आर्थिक घडीची आकडेवारी




  • सध्या 462 बसेस सुरु

  • सध्या दररोज 1 लाख 51 हजार प्रवासी संख्या

  • बसेस बंद असताना दररोज दिड कोटींचं नुकसान

  • लॉकडाऊन दरम्यान एकूण 200 कोटींचा फटका

  • संचलनाची तूट 183 कोटींवर

  • पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकांकडे देणे बाकी

  • फ्यूएलचे जवळपास 38 कोटी देणं बाकी


PMPML | पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये बससेवा आरंभ, प्रवासासाठी 'हे' नियम पाळावेच लागणार