पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी गावठी बनावटीचे 18 पिस्तुल आणि 27 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी सहा जणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्याविरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हडपसर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना त्यांनी संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या अरबाज खान याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता एक पिस्तुल सापडलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करुन अधिक चौकशी केली. यानंतर त्याने इतर आरोपींची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी इतर आरोपींना अटक करुन पिस्तुल जप्त केली. या सर्व पिस्तुलांची किंमत 5 लाख 68 हजार इतकी आहे.
अरबाज खान, सूरज चिंचणे, कुणाल शेजवळ उर्फ यश, जयेश गायकवाड, विकास भगत तौर उर्फ महाराज आणि शरद बन्सी मल्लाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेत असलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुण्यासह ग्रामीण पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यातील अनेकांवर पिस्तुल तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
आरोपींनी एवढा मोठा शस्त्रसाठा कशाला आणला होता? कोणाला दिला जाणार होता? की काही घातपात करायचा होता याचा तपास हडपसर पोलीस करत आहेत.