पुणे : ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पुण्यातला दोन दिवसांचा मुक्काम आटोपला की पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ होते. पुणे ते सासवड हे 31 किलोमीटरचं अंतर वारकरी एका दिवसात पार करतात. पुणे ते सासवड मार्गावरचा एक अवघड टप्पा म्हणजे दिवेघाट. ज्ञानोबा माऊली- तुकाराम असा गजर टाळ मृदुंगाच्या तालावर करत वारकरी हा टप्पा लिलया पार करतात. यावर्षी दिवेघाट चढल्यानंतरचा वारकऱ्यांचा थकवा एका क्षणात दूर झाला असता. याचं कारण म्हणजे दिवेघाट संपता संपता झेंडेवाडीमध्ये तब्बल 60 फूट उंचीची विठ्ठलाची मुर्ती दिमाखात ऊभी आहे.


ही मुर्ती सगळ्यांचं लक्ष आकर्षून घेते आहे. विजय कोल्हापूरकर या पुण्यातील हाॅटेल व्यावसायिकाने ही विठ्ठलाची मूर्ती ऊभारली आहे. झेंडेवाडीमध्ये विजय कोल्हापुरकर यांची जागा आहे आणि त्यावर ही विठ्ठलाची मूर्ती ऊभारण्यात आली.


ही भव्य मुर्ती बनवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. आधी कारखान्यात ही मूर्ती घडवण्यात आली आणि त्यानंतर दिवेघाटात पक्का पाया रचून त्यावर या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पण यावर्षी पायी आषाढी वारी नसल्यामुळे लाखो वारकऱ्यांना मात्र या भव्य आणि नयनरम्य अशी विठ्ठल मुर्तीचं प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही.


“दिवेघाट चढून आल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा एवढीच माझी इच्छा होती. विठूरायाकडे मी दुसरं काहीच मागत नाही. ही मुर्ती घडवण्याचं काम गेली दोन वर्ष सुरु होतं,” असं विजय कोल्हापूरकर यांनी सांगितलं.


ही विठ्ठल मुर्ती वैशिष्टयपुर्ण आहे. ऊन वारा पाऊस यामध्ये तिची झिज होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. तसंच या मुर्तीचा जो चंदनाचा टिळा आहे तो पंचधातुंपासून बनवण्यात आला आहे आणि त्यावर सोन्याचा मुलामाही देण्यात आल्याचं विजय कोल्हापूरकर यांनी सांगितलं.


संबंधित बातम्या :




माझा विठ्ठल माझी वारी! दिवेघाटात कसा भरतो वैष्णवांचा मेळा?ज्ञानोबा-सोपानकाकांच्या भेटीची काय परंपरा?