पुणे : कोरोनाच्या परिस्थितीत पुण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस आज पुणे शहरातील दौऱ्यावर असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यांनी या शहराच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. आवश्यक इतक्या चाचण्या पुण्यात झाल्या नसून कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं.


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, त्यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभी करावी लागणार आहे. पावसाळा लागल्याने रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेकडून तयारी केली जात आहे.


पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी आपली संसाधनं वापरून कोरोना विरुद्ध लढण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्याच्या महापौरांनी सांगितलं की त्यांनी दीडशे कोटी रुपये खर्च केला आहे. महापालिकांना खर्च करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे राज्य सरकारने महापालिकांना मदत करावी, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलं.


दिल्लीत दररोज 18 हजार टेस्ट होत आहेत. आपली क्षमता 34 हजारांची असताना आपण 14 हजार टेस्टच रोज करतोय. ही संख्या वाढवण्याची गरज आहे. पुण्यासारख्या शहरात आणखी टेस्ट व्हायला हव्यात. ज्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढतेय ते पाहता बेड आणि व्हेंटिलेटरचं नियोजन करण्याची गरज आहे. प्रशासन प्रयत्न चांगला करतंय. खाजगी हॉस्पिटल्सचे नियोजन व्यवस्थित होतं नाही. लोकांना खाजगी हॉस्पिटल्सचे बेड मिळत नाहीत आणि मिळाले तर त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. एकाच घरातील अधिक लोकं बाधित झाले तर त्या घराचं दिवाळं निघेल अशी परिस्थिती आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.


सध्याची परिस्थिती मी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून देणार आहे. अजित पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ही वेळ कोणाचं मुल्यमापन करण्याची नाही. अजित पवाराशी मी फोनवरुनही बोलू शकतो.


Devendra Fadnavis Pune | कोरोना परिस्थितीत राज्य सरकारचं पुण्याकडे दुर्लक्ष झालंय - देवेंद्र फडणवीस