पुणे : पुण्यातील पक्षीप्रेमींनी पुढाकार घेऊन ‘पुणे पक्षीकोष’ बनवण्याचं काम हाती घेतलं आहे. पश्चिम घाटाजवळ असलेल्या पुणे शहर आणि सभोवताली जैव विविधता आहे. पुणे शहरात पक्ष्यांच्याही निरनिराळ्या जाती आढळून येतात. पण वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे पुणे शहर आणि परिसरात पक्ष्यांच्या विविध कोणत्या जाती आहेत, काळाच्या ओघात कोणत्या जाती नष्ट झाल्या, स्थलांतरणासाठी येणाऱ्या पक्ष्यांचे कोणते पॅटर्न आहेत या सगळ्यांचा अभ्यास आणि डॉक्यूमेंटेशन या पक्षीकोषामध्ये होणार आहे. पुण्यातील अनेक पक्षीप्रेमींनी एकत्र येऊन हा प्रोजेक्ट हातात घेतला आहे.
हा प्रोजक्ट जवळपास 3 वर्ष चालणार असून यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील पक्षीप्रेमी सहभागी झाले आहेत. एमआयटी विश्व विद्यायालयात इकॉलॉजी प्रोफेसर असलेल्या पंकज कोपर्डे यांनी सांगितले की, “या प्रोजक्टच्या अंतर्गत आम्ही पुणे पालिकेच्या 300 स्क्वेअर किलोमिटरच्या एरियामधल्या पक्ष्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करणार आहोत. लोकसहभागातून पक्षीनिरिक्षण अशी संकल्पना आहे. ‘बर्ड एटलास’ म्हणजे पक्षिकोश ही काही नवीन संकल्पना नाहीये. बऱ्याच देशांमध्ये आणि आपल्याही काही राज्यांमध्ये ही राबवली गेली आहे. पण महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा पक्षीनिरीक्षक प्रोजेक्ट ठरेल.”
या पक्षीकोष बनवण्याचं काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरु झालं. पण लॉकडाऊनमुळे काही काळ त्यात खंड पडला. पण फेब्रुवारी महिन्यात जे काम झालं त्यामधून 120 पक्ष्यांच्या जातींची नोंद केली गेली. “पुणे पालिकेच्या हद्दीत पक्ष्यांच्या जितक्या जाती आहेत त्यापैकी 20 टक्के पक्ष्यांच्या जातींची नोंद आपल्याकडे झाली आहे. त्याचं सॅम्पलिंग झालं आहे. लॉकडाऊननंतर आता आम्ही कामाला परत सुरुवात करणार आहोत,” अभियांत्रिकी विद्यार्थी असलेल्या मधूर राठीने ही माहीती दिली.
शहरातल्या जैवविविधतेची नोंद असणं आवश्यक आहे. म्हैसूर शहराचा अशा प्रकराचा पक्षीकोष तयार करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पुण्याचाही पक्षीकोष बनवण्याचं काम या पक्षीप्रेमींनी हाती घेतलं आहे. “पक्षीकोष बनवण्याचं काम 3 वर्ष चालेल. ऊन्हाळ्यात आणि पावसाळ्यात आम्हाला पक्ष्यांची नोंद करायची आहे. आपण कोणत्या पक्ष्यांचं जतन करायला पाहीजे हे या प्रोजेक्टमधून कळेल,” असं निखिल जोशी यांनी सांगितलं.