पिंपरी-चिंचवड : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह गृहमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारी अर्जाची पिंपरी चिंचवड पोलिसांमध्ये चांगलीच चर्चा रंगलीय. बघता-बघता हा अर्ज सोशल मीडियावर ही व्हायरल झालाय. एका पोलीस नाईकने थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकापासून जीवाला धोका असल्याचं त्यात म्हटलंय. संबंधित अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्तांसाठी हफ्तेखोरी आणि बेकायदेशीर कामं करत असे. यासाठी तक्रारदार पोलीस नाईकास ही धमकावत असे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांच्या ही नावाचा तक्रारीत उल्लेख असल्याने शहरात खळबळ उडालीये. पण तक्रारदाराने त्याच्या नावाचा वापर करून षढयंत्र रचल्याचं तसेच संबंधित अधिकाऱ्याने देखील यात काही तथ्य नसल्याचं म्हटलंय. पण नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्हायरल अर्जाची गंभीर दखल घेत, चौकशीचे आदेश दिलेत.


पिंपरी चिंचवड खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्यापासून जीवाला धोका आहे. म्हणून पोलीस नाईक नितीन लोखंडे यांनी संरक्षण मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी अर्ज केलाय. हीच प्रत उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह खात्यातील सर्व अधिकाऱ्यांना ही पाठवल्याचं त्यात नमूद आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला हा तक्रारी अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यात तत्कालीन पोलीस आयुक्तांचे तळेगावमध्ये शंभर एकरात फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसच्या देखरेखीसाठी माझी बेकायदेशीर नेमणूक करण्यात आली, यासाठी पोलीस निरीक्षक अस्पत आणि तत्कालीन पोलीस आयुक्त मला वेतन द्यायचे असं व्हायरल तक्रारीत म्हटलंय. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी त्यांच्या हफ्तेखोरीसाठी पोलीस निरीक्षक अस्पत यांना दोन कक्ष दिले होते. एक पोलीस आयुक्तालयात तर दुसरे कासारवाडी येथे. खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाचा कारभार हा आयुक्तालयातील कक्षातून चालायचा पण हफ्तेखोरी, बेकायदेशीर कामांसह अनेक दुष्कृत्ये कासारवाडीत चालायची. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि काही पत्रकारांना हाताशी धरल्याचं ही या तक्रारीत नमूद आहे. त्यामुळं व्हायरल अर्जाला घेऊन शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली.



चहूबाजूंनी या अर्जाला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या पर्यंत देखील हा तक्रारी अर्ज पोहचला. अर्जात नमूद बाबी गंभीर असल्यानं आयुक्त प्रकाश यांनी अर्जावर तक्रारदार म्हणून नाव असलेले पोलीस नाईक नितीन लोखंडे आणि पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांना चौकशीसाठी बोलावलं. लोखंडेंनी असा कोणताही अर्ज केला नसल्याचा खुलासा दिला. तसेच त्यांच्या नावाचा गैरवापर करून पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांची बदनामी केल्याप्रकरणी चौकशीची मागणी केली. मग त्यानंतर प्रश्न हा उपस्थित झाला की, पोलीस कर्मचाऱ्याच्या नावाचा वापर करून हा तक्रारी अर्ज कोणी लिहिला. शिवाय त्यात पोलीस निरीक्षक अस्पत, तत्कालीन पोलीस आयुक्त, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांच्या नावाचा उल्लेख कोणी आणि का केला. या प्रश्नांचा छडा प्रत्येक घटनेच्या मुळापर्यंत जाणारे आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश कसे लावतात याकडे शहराचं लक्ष लागून आहे.



सुधीर अस्पत - पोलीस निरीक्षक


या अर्जात काही तथ्य नाही. माझ्या कर्मचाऱ्याच्या नावाचा यात वापर केला गेलाय. संबंधित पोलीस नाईकने अशी कोणतीही तक्रार केली नसल्याचं लेखी लिहून दिलंय. वरिष्ठ अधिकारी याबाबत चौकशी करत आहेत.


नितीन लोखंडे - पोलीस नाईक


माझ्या नावाने व्हायरल झालेला अर्ज मी लिहिलेला नाही. कोणीतरी माझ्याबाबतीत षडयंत्र रचत आहे. म्हणूनच मी याप्रकरणाची चौकशी करण्याची अर्जाद्वारे मागणी केलेली आहे.


कृष्ण प्रकाश - पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तक्रारी अर्ज प्रकरणाची चौकशी करण्याच्या पोलीस उपायुक्तांना सूचना देण्यात आल्यात. पोलीस नाईक नितीन लांडगेंनी हा अर्ज लिहिला नसल्याचं म्हटलंय तसेच हा अर्ज कोणी लिहिला असेल याबाबत ही त्यांना माहिती नाही. पण अर्जात तथ्य आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. त्यातून हे अर्ज कोणी लिहिलंय हे ही स्पष्ट होईलच.