पुणे : बाबरी मशिद विध्वंस प्रकरणात आलेला न्यायालयाचा निकाल हा आपल्याला अपेक्षित नव्हता, असं माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी म्हटलंय. माधव गोडबोले हे जेव्हा बाबरी मशिद पाडली गेली तेव्हा केंद्रीय गृह सचिव होते. त्याचबरोबर बाबरी मशीद पाडणं हे अचानक घडलं नाही. त्यासाठी काही काळ पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती, असंही माधव गोडबोले यांनी म्हटलंय.


आजच्या निकालाविरोधात केंद्र सरकारने उच्च न्यायालयात आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात देखील जायला हवं अशी अपेक्षाही माधव गोडबोले यांनी व्यक्त केलीय. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेलल्या घटनांवरून भारताची वाटचाल हिंदू राष्ट्राच्या दिशेने सुरु झाली असल्याचं आपल्याला जाणवत असल्याचेही गोडबोले म्हणालेत. भारताचा पाया हा धर्मनिरपेक्ष राज्य पद्धतीत असून तो कमकुवत होत असताना त्याचं रक्षण करण्यात विरोधी पक्ष कमी पडत असल्याचं माधव गोडबोलेंनी म्हटलंय. आज निकाल देताना न्यायालयाने बाबरी मशिद पाडली जाणं हा कारस्थानाचा भाग नव्हता असं म्हटलंय. मात्र आपल्याला तसं वाटत नाही असं माधव गोडबोले म्हणालेत.

बाबरी मशिद पाडली जाणं ही उत्स्फूर्त घटना नव्हती तर त्यासाठी आधीपासूनच पार्श्वभूमी तयार करण्यात आली होती. बाबरी प्रकरणाचा निकाल आल्यानंतर काशी, मथुरा आणि इतर ठिकाणच्या धार्मिक स्थळांबद्दलची मागणीही आक्रमक पद्धतीने होऊ लागलीय. ती पाहता आपण हिंदू राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसून येत असल्याचं गोडबोलेंनी म्हटलंय. हिंदू राष्ट्र होणं हे ज्या देशात 20 टक्के जनता अल्पसंख्यांक आहे त्या देशासाठी अडचणीचं ठरू शकतं, असं गोडबोलेंनी म्हटलंय. तसं झाल्यास ज्या राज्यांमध्ये अल्पसंख्यांक अधिक आहेत अशा पंजाब, काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमधूनही अशाचप्रकाराच्या मागण्या पुढं येऊ शकतात, अशी भीती गोडबोले यांनी व्यक्त केलीय.


Babri verdict : ऐतिहासिक निकाल, 28 वर्ष, 49 आरोपी... विध्वंस ते निकाल, संपूर्ण घटनाक्रम


भारताचा पाया हा धर्मनिरपेक्ष राज्यपद्धतीवर रचण्यात आला आहे. त्याचं रक्षण करण्यात विरोधी पक्ष कमी पडतायत. ज्या पक्षांनी देशाची राज्यघटना तयार करण्यात महत्वाची भूमिका पार पडली होती ते पक्ष आणि त्या पक्षाचं नेतृत्व लोकांमध्ये धर्मनिरपेक्षतेचं महत्व पटवून देण्यात कमी पडतंय असंही माधव गोडबोले यांनी म्हटलंय. आता जनभावना ही धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ करण्याकडे आहे. मात्र जनमानस तयार करणं, लोकांची मतं घडवणं हे राजकीय नेतृत्वाच काम असल्याचेही गोडबोले यांनी म्हटलंय.


बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष 


माधव गोडबोले हे बाबरी मशिदीचा विध्वंस झाला तेव्हा गृह सचिव असल्याने त्यांच्याकडे सर्व घटना आणि घडामोडींची माहिती आपसूक पोहचत होती आणि त्यावेळची निर्णय प्रक्रियाही त्यांनी जवळून पाहिलीय. निवृत्तीनंतर गोडबोले यांनी अनेक पुस्तकं आणि लेखांच्या माध्यमातून रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा विध्वंस याबद्दल भाष्य केलंय. भारताची राजकीय प्रक्रिया पुन्हा सुरळीत व्हावी यासाठी धर्म आणि राजकारण यांची फारकत व्हायला हवी असं गोडबोलेंच म्हणणंय. त्यासाठी देशाच्या संसदेत कायदा व्हायला हवा असंही मत गोडबोले यांनी वेळोवेळी व्यक्त केलीय.


गोडबोले यांनी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणावर व्यक्त केलेल्या मताबद्दल प्रतिक्रियाही उमटतायत. मात्र लोकांचं मत बनवण्यासाठी राजकीय नेतृत्वाने पुढाकार घ्यायला हवा असं गोडबोले आवर्जून सांगतायत. परखड मतं ही पुरावे आणि संदर्भ यांच्यावर आधारित असल्यानं त्यांच्याशी सहमत नसणाऱ्यांनाही ती खोडून काढणं अवघड जात असल्याचं आतापर्यंत दिसून आलंय.