पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचाच कालावधी राहिल्याने आता महाविकास आघाडीसह महायुतीकडून रणशिंग फुंकण्यात आलं आहे. विविध योजनांच्या माध्यमातून महायुतीकडून वातावरण निर्मिती केली जात असतानाच महाविकास आघाडीकडून सुद्धा यात्रांच्या माध्यमातून लोकसभेचा माहोल कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीमधील तीन दिवसांच्या भेटीगाठीनंतर राज्यामध्ये शरद पवार गटाकडून सुद्धा शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.


यात्रा आज पुणे जिल्ह्यात पोहोचली असता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली. त्याचबरोबर लाडकी बहिण योजनेवरून सुद्धा सडकून टीका केली. जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडी राज्यामध्ये किती जागा जिंकणार याबाबत थेटपणे सांगितलं. निवडणूक कधी लागेल या संदर्भाने सुद्धा भाष्य केलं.


सरकार घाबरलं असून दिवाळीनंतरच निवडणूक घेणार


जयंत पाटील म्हणाले की सरकार घाबरलं असून दिवाळीनंतरच निवडणूका घेणार आहे. कदाचित 15 नोव्हेंबरनंतर निवडणूक लागेल. तोपर्यंत जनतेची दिशाभूल करणाऱ्या अनुषंगाने आपली तिजोरी खाली करण्यासाठी यांना अधिकचा वेळ हवा आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली. ते पुढे म्हणाले की मागील वेळी शिवस्वराज्य यात्रा झाली त्यावेळी सुद्धा पहिली सभा पार पाडून मी सांगलीला गेलो होतो. बरोबर तो आजचा दिवस होता. सांगलीत पाणीच पाणी झालं होतं. त्यावेळी आमची बोट पाण्यामध्ये अडकली होती तेव्हा मी त्यातून सुखरूप बाहेर पडलो. आज पुन्हा एकदा क्रेन कलल्याची बातम्या झाल्या. म्हणजे अमोल कोल्हे साहेब राज्यात आपल्याकडे लक्ष आहे. आता बदल आढळ असल्याचं ते म्हणाले. 


लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीका


दरम्यान, लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसे यांनी सडकून टीका केली. लाडकी बहीण, लाडकी बहीण करत आहात, यापेक्षा आम्हा महिलांना सुरक्षित वातावरण हवं आहे. आम्हाला 1500 रुपये देऊन, तुम्ही आमचं मत घेऊ इच्छिता. पण आमचं मन यात रमलेलं नाही. माझ्या माता-भगिनींच्या मुलाला नोकरी हवी, बापानं अन पतीने शेतात घाम गाळून पिकविलेल्या पिकाला भाव हवा आहे. आम्हाला चिंता असते, पिकाला भाव मिळाला नाही तर माझा बाप आत्महत्या करणार नाही ना? माझ्या भावाच्या हातात नोकरी नसेल तर आम्हाला रक्षाबंधनाला माहेरी जाण्यात आनंद आहे? तुमच्या 1500 रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का? पण या निर्लज्ज सरकारला याचं काही देणं-घेणं नाही. त्यामुळं यांना महिला अद्याप समजल्या नाहीत. यांना वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या