कोल्हापूर : कलानगरी, सांस्कृतिक नगरी, क्रीडा नगरी, कुस्ती पंढरी, खाद्य नगरी अशी विविध शाब्दिक आभूषणे कोल्हापूर नगरीसाठी दिले जातात. कलाकारकारापासून ते खेळाडूंना देशपातळीवर चमकण्यासाठी लागणारं सर्व काही या नगरीने दिले. कोल्हापूरचे मानबिंदू आणि देदीप्यमान वारशाचा चालता बोलता इतिहास म्हणून ऐतिहासिक खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृहाचा समावेश होतो. या दोन्ही वास्तूंची उभारणी करवीरचे विधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली. मात्र, हे दोन्ही वारसास्थळे गुरुवारी रात्री आगीत भस्मसात झाली. या आगीत खासबाग मैदानाचे व्यासपीठ आगीत राख होऊन गेले.


केशवरावांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला नाट्यगृहात आगीत खाक


नाट्यगृहातील व्यासपीठ, ध्वनी यंत्रणा, खुर्च्या सर्व काही जळून संपून गेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूरकरांच्या सांस्कृतिक ठेव्यावर नियतीने आघात केला आहे. समस्त कोल्हापूरकरांसह अनेक कलाकार केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झाल्याने धाय मोकलून रडत आहेत. वारसा संपल्याची भावना व्यक्त होत आहे. दुर्दैवाचा फेरा म्हणजे संगीतसूर्य केशवराव भोसले यांची आज जयंती असल्याने परिसरात मंडप सजला होता. इतकेच नव्हे तर अनेक बालकलाकार ते वृद्ध महिलांपर्यंत काल रात्री साडेआठपर्यंत रंगीत तालीम करण्यासाठी नाट्यगृहामध्ये हजर होते. केशवरावांच्या जयंतीनिमित्त आज आणि उद्या असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रम या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. मात्र, हे कार्यक्रम होण्यापूर्वीच अन् कलाकारांनी परफॉर्मन्स देण्यापूर्वीच गुरुवारी रात्री लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण केशवराव भोसले जळून खाक झालं आहे. 


कोण होते केशवराव भोसले?


राजर्षी शाहू महाराजांचा सहवास आणि कौतुकाची थाप मिळालेल्या केशवराव भोसलेंचा जन्म कोल्हापुरात झाला होता. 1890 साली त्यांचा जन्म झाला. मात्र, लहान वयात वडिलांचे छत्र हरपल्याने घरची सुद्धा जबाबदारी येऊन पडली. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी ललित कलादर्शन नाटक मंडळीची स्थापना केली होती. तत्पूर्वी त्यांनी जनुभाऊ निमकर यांच्या स्वदेश हितचिंतक नाटक कंपनीत ते पडेल ते काम करत होते. सर्वजण त्यांना केश्याच म्हणत होते. मात्र, त्यांचा उत्साह दांडगा होता. एकदा याच कंपनीच्या शारदा नाटकात शारदेची भूमिका सुंदर रंगवणारा कलावंत आजारी पडला. आजारपणामुळे रात्रीचा प्रयोग रद्द होण्याची चिन्ह होती. परंतू स्वदेश हितचिंतक कंपनीने प्रयोग रद्द करत नसल्याने जनुभाऊ निमकरांनी थेट केश्यालाच संधी देऊन टाकली. त्यांनी केश्याकडून रंगीत तालीम करून घेतली. याच प्रयोगाला शाहू महाराज उपस्थित असल्याने अवघ्या पंचक्रोशीत चर्चा रंगली होती. 


केश्याने आवाजाने सगळेच मंत्रमुग्ध


अपघाताने संधी मिळूनही केश्याने नाटकात धमाल उडवून देत सुरेल पद्धतीने गाणी गायली. उपस्थितांनी त्याला दाद दिली.  त्यामुळे नाटकातील गाण्याला केश्याला नऊ वेळा वन्स मोअर मिळाला. शाहू महाराजांनी सुद्धा उपस्थितांचा उत्साह पाहून एकदा वन्स मोअर घेण्यास सांगितले होते. यावरून त्यांच्या प्रतिभेची जाणीव सर्वांनाच आली. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी ललित कला दर्शन नाटक मंडळी स्थापना केली होती. 1916 मध्ये राज्यश्री शाहू महाराज यांनी त्यांना कोल्हापूरसाठी निमंत्रित केलं होतं. कोल्हापूरमध्ये त्यांना दहा हजार रुपये मिळाले होते. यावेळी त्यांना मोठा मानसन्मान देण्यात आला होता. त्यांनी मिळालेल्या देणगीचा वापर अनेक संस्थांना देणगीच्या रुपात दिला. 20 वर्ष रंगभूमी गाजवणाऱ्या केशवराव भोसले यांनी वयाच्या 32व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 


इतर महत्वाच्या बातम्या