Jayant Patil: राज्यात आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी तयारी सुरू झाली आहे. अशातच निवडणुका होण्याआधीच मुख्यमंत्री पदावर कोण बसणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक बैठका, सभा, दौरे सुरू आहेत, अशातच काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. 7 तारखेला महाविकास आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केलं. "महाविकास आघाडीत जागावाटप लवकरच होणार आहे. त्यामुळं राज्याच्या संस्कृतीनुसार मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढं केला जाणार नाही. ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल," असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, त्यांच्या या वक्तव्यावर जयंत पाटलांना (Jayant Patil) प्रश्न केला असता त्यांनी उत्तर देणं टाळलं असल्याचं दिसून आलं.
आज शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करण्यात आली. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, महबुब शेख यांच्यासह कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटलांना मविआचा विधानसभा निवडणुकीचा चेहरा कोण? असा पश्न विचारण्यात आला होता, यावेळी 'हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा महायुतीला त्यांचा चेहरा कोण, हा प्रश्न त्यांना विचारा', असं म्हणत या प्रश्नावर उत्तर देणं जयंत पाटलांनी (Jayant Patil) टाळलं आहे.
मुख्यमंत्री पदावर राऊत, शरद पवारांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) असायला हवे, अशी इच्छा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली होती.बिनाचेहऱ्याची निवडणूक लढू नये, असे राऊत म्हणाले होते. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर देताना ठाकरे गट, काँग्रेस, आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. मुख्यमंत्रीपदासाठी आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे. सामुहिक नेतृत्व हे आमचं सुत्र आहे', असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते. तर आता या चर्चेदरम्यान जयंत पाटलांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) दिल्लीला जाऊन ही बाब मविआच्या दृष्टीने चांगली आहे. एकसंध होऊन आम्ही निवडणुका लढणार, एकत्रित सगळे निर्णय घेणार आहोत. मविआचा विधानसभा निवडणुकीचा चेहरा कोण? हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा महायुतीला त्यांचा चेहरा कोण, हा प्रश्न त्यांना विचारा, असं जयंत पाटील (Jayant Patil) यावेळी बोलताना म्हणालेत.