पिंपरी चिंचवडमधील भोस आणि थोपटे कुटुंबीयांनी आपल्या मायभूमीसाठी दुश्मनांशी दोन हात करताना जखमी झालेल्या या जवानांना आपल्या मुलांच्या विवाहात प्रमुख पाहुण्यांचा मान दिला. या विवाहसोहळ्यात कोणत्याही राजकीय नेत्याचा सत्कार झाला नाही, तर कारगिल युद्धात जखमी झालेल्या दहा जवानांना सन्मानित करण्यात आलं. हे या लग्नाचं मुख्य वैशिष्ट्य असल्याने, या लग्नाचं सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे.
नववधू प्रियांका भोस यांचे वडील धनेश्वर भोस यांचाही पाय कारगिल युद्धात निकामी झाला. त्यामुळेच भोस यांनी निवृत्तीनंतर कारगिल युद्धात आपल्यासोबत जखमी झालेले जवान आणि माजी सैनिकांसाठी काहीतरी करायचंच असं ठरवलं होतं. ते मुलीच्या लग्नात त्यांनी सत्यात उतरवलं. प्रियांका ज्या तरुणाशी लगीनगाठ बांधणार होती, त्या वैभव थोपटेने ही संकल्पना मान्य केली.
नववधूच्या उखाण्याने तर चारचांद लावले. "भारतमातेच्या सैनिकाची मी कन्या, मागते जोगवा.... वैभवरावांचे नाव घेते, प्रत्येकाने मनामध्ये देशभक्तीची ज्योत जागवा." प्रियांकाच्या या उखाण्याने लग्नमंडपात एकच जल्लोष झाला.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत पार पडणाऱ्या विवाहात पुढाऱ्यांचा मानसन्मान करण्याची जणू प्रथाच पडली आहे. पण या प्रथेला भोस आणि थोपटे कुटुंबीयांनी थारा दिला नाही. उलट कारगिल युद्धात अपंगत्व आलेल्या जवानांना आणि माजी सैनिकांचा सन्मान करुन नवा पायंडा पाडलाय, याचं अनुकरण समाजाने करणं गरजेचं आहे.