पुणे : निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच शुभेच्छा दिल्या. यावर सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांनी पिंपरी-चिंचवड येथे बोलताना पंकजा मुंडे यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतोय असं सांगत पवित्र गहिनीनाथ गडावरुन मला शुभेच्छा देण्याची त्यांना सद्बुद्धी मिळाली याचा आनंद आहे, असा टोला देखील लगावला.

धनंजय मुंडे म्हणाले की, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या विरोधी उमेदवार पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आजपर्यंत त्यांच्या काही शुभेच्छा मिळाल्या नव्हत्या. कालही त्या मला ऐकायला मिळाल्या नाहीत. पण मी माध्यमांकडून सोशल मीडियाकडून जे काही ऐकलं पाहिलं. त्यातून त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मनापासून शुभेच्छा दिल्याचा आनंद आहे. वामनभाऊच्या वास्तव्य आणि त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या गहिणीनाथ गडावरती त्यांना मला शुभेच्छा देण्याची सद्बुद्धी मिळाली. मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे. त्या शुभेच्छा सर्वसामान्य माणसाच्या सेवा करण्याच्या प्रेरणा देत राहील.  मी धन्यवाद देखील मानले आहेत. त्या शुभेच्छा जनसेवेच्या सत्कार्यासाठी मी कामी पाडेन एवढं निश्चित आहे, असं मुंडे म्हणाले.


पवार नसते तर धनंजय मुंडे कुठंच नसते
मराठवाड्यातील नागरिकांसाठी धंनजय मुंडे यांच्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड येथील रावेत येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. पाच वर्षांपूर्वी मला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांनी दिली नसती तर आज हा भाऊ तुम्हाला कुठंच दिसला नसता. 2014 साली मला कोणी चांगलं बोलत नव्हतं. गद्दार, घरफोड्या, पाटीत खंजीर खुपसला, धन्या, माझी लायकी, शिव्यांच्या राखोळ्या, खलनायक म्हणायचे. पण जसजसे लोक काम पहायला लागले. धन्याचा धनंजय झाला. धनंजयचा धनू भाऊ झाला आणि आता धनू भाऊंचा मंत्री झालो. शेवटी काहीही झालं तरी नियती इमानदारीच्या मागे असते. हे मी पाहिलं. गेली सात वर्षे मी काय नाही पाहिलं. सर्व सहन केलं, दुःख कधीच व्यक्त नाही केलं. समाजसेवेचा वसा अण्णा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंकडून घेतला जो अजून सोडला नाही, असे मुंडे म्हणाले.

संबंधित बातम्या

'एबीपी माझा' इम्पॅक्ट; 'माझे पप्पा' भावनिक निबंध लिहिणाऱ्या चिमुकल्याला धनंजय मुंडेंचा मदतीचा हात 

बजाज पीक विमा कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे धनंजय मुंडेंचे आदेश 

कट्टर राजकीय विरोधक पंकजा आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर 

बदनाम, गद्दार म्हणून कितीतरी वर्ष मला हिणवले.. आता न्याय झाला : धनंजय मुंडे