Pune Fire News : घरगुती सिलेंडरमधून वायू गळती (Pune Fire) झाल्याने स्फोट होत आग लागल्याची घटना घडली. आज पहाटे नऱ्हे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील सोनाई निवास येथे चार मजली इमारत असलेल्या ठिकाणी तळमजल्यावरील घरामध्ये ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत (Pune Accident) घरातील महिला जखमी झाली आहे. चैत्राली ईश्वर मांढरे असं 29 वर्षीय महिलेचं नाव आहे. 


अग्निशमन दलाला माहिती मिळताच सिंहगड अग्निशमन केंद्राचे वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. घटनास्थळी पोहोचताच घरामधील वायू गळती असणारा सिलेंडर सुरुवातीला बाहेर काढला. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने जवानांनी पाण्याचा मारा करत घरातील वस्तूंना लागलेली आग पसरु न देता पूर्ण विझवली त्यामुळे मोठा धोका टळला आहे. 


या घटनेत घराचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचवेळी जवानांनी घरातील रिकामे दोन सिलेंडर बाहेर काढले आणि सुरक्षेच्या कारणास्तव वायू गळती होत असलेला सिलेंडर ताब्यात घेतला. दलाची मदत पोहोचण्याआधी घरातील महिला ही आगीमुळे जखमी झाल्याने तिच्या पतीने तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अधिकारी प्रभाकर उम्राटकर, तांडेल पांडुरंग तांबे, वाहन चालक संतोष चौरे आणि फायरमन नितीन मोकाशी, सतीश डाकवे, संजू चव्हाण तसेच मदतनीस कोकरे, जाधव यांनी सहभाग घेतला.


घराचं मोठं नुकसान
पहाटे लागलेल्या या आगीमुळे कुटुंबियांची तारांबळ उडाली होती. गॅसचा दुर्गंध सगळीकडे पसरला होता. या दुर्घटनेने घरातील लोक घाबरले होते. त्याच्या घरातील वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. घरातील इलेक्ट्रिकच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामुळे कुटुंबियांचं मोठं आर्थिक नुकसान देखील झालं आहे. 


नारायणगावात विक्रम मंडप डेकोरेटर गोडाऊनला आग 
दुसरीकडे नारायणगावात विक्रम मंडप डेकोरेटरच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत मंडप आणि डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले. यामुळे विक्रम मंडप डेकोरेटर मालकाचं मोठं नुकसान झालं आहे. लाखो रुपयाचा माल जळून खाक झाला आहे. डेकोरेशनचे लाकडी फर्निचर, स्टेज, शाही खुर्च्या, सोफासेट, प्लायवूड, गाद्या, रेशमी कापड, सजावटीचे साहित्य, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीचे मंडप आणि डेकोरेशनचे साहित्य होते. हे सगळं साहित्य आगीत जळून खाक झालं आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अजून समजू शकलं नाही.