Pune rename Jijaunagar : पुणे शहराचे नामकरण (Pune) "जिजाऊ नगर" व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेडनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ही मागणी केली आहे. मात्र हिंदू (Hindu Mahasangh) महासंघाने या मागणीला विरोध केला आहे. त्यामुळे पुण्याच्या नामांतराचा वाद पेटण्याची शक्यता आहे.
संभाजी ब्रिगेडनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत ही मागणी केली आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत पुण्याच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित करुन सरकारकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पुणे शहराचं नामांतर "जिजाऊ नगर" व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. यापूर्वी ही मागणी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी पुण्यासाठी दोन नावे सांगितली होती. 'जिजाऊनगर' अथवा 'जिजापूर' ही दोन नावे पुण्याला देण्यात यावी, असं पासलकर यांनी म्हणाले होते. त्यामुळे पुण्याच्या नामांतरासाठी राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याचं दिसत आहे.
नामांतराच्या मागणीला हिंदू महासंघाचा विरोध
या मागणीला हिंदू महासंघाने विरोध केला आहे. पुण्याच्या नामांतराची गरज नाही. जिजाऊंचं भव्य आणि वेगळं स्मारक उभारा आणि ते लाल महालमध्ये उभारा, असं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलं आहे. "पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करण्याची मागणी ब्रिगेडने केली आहे. राजमाता या सर्वांनाच वंदनीय आहेत आणि पुण्याचे आणि त्यांचे नाते सुद्धा आहे. पण पुणे हे नाव पुण्यश्वर महादेवमुळे पडले आहे त्यामुळे ते बदलण्याची गरज नाही. स्वतः शिवभक्त शिवछत्रपती यांनी सुद्धा ते बदलले नाही. त्यापेक्षा पुण्यश्वर महादेव त्या दर्ग्यातून बाहेर काढण्यासाठी ब्रिगेडने आमच्या बरोबर यावे. राजमाता जिजाऊ यांना ते जास्त आवडेल," असंही त्यांनी म्हटलं आहे.
नामांतराचा वाद पेटणार?
संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र भूमिका घेतली आहे. त्याला हिंदू महासंघाने विरोध केला आहे. पुण्याचं नाव शिवाजी महाराजांनी देखील बदललं नव्हतं. त्यामुळे आता नाव बदलायची गरज नाही, अशी भूमिका ब्राह्मण महासंघाने घेतली आहे. त्यामुळे आता पुण्याच्या नामांतराचा वाद पेटण्याची शक्यता आहे. पुण्याच्या नामांतरासाठी संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हिंदू महासंघ आमनेसामने येणार असल्याची शक्यता आहे. येत्या काळात पुण्याच्या नामांतराबाबत काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं आहे.