Pune MPSC Protest : एमपीएसीची तयारी करणारे विद्यार्थी(MPSC) आज राज्यभर आंदोलन करत आहेत. युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आहे. शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्याच्या शेजारच्या शहरातील विद्यार्थीही यात सहभागी झाले आहेत.
एमपीएसीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन हे आंदोलन सुरु आहे. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात या विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू केला तर सध्याचा अभ्यासक्रमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळणार आहेत. नव्या पॅटर्नला विद्यार्थ्यांचाा नकार नाही, मात्र अभ्यासाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या या मागणीवर सरकार नेमका कोणता निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचं असणार आहे.
MPSC Students Protest in Pune : पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
अलका टॉकीज चौकाकडून शनिवार पेठेत जाणाऱ्या रस्त्यावर शेकडो विद्यार्थी एकवटले आहेत. त्यांच्यासोबत युवक कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी देखील सहभागी झाले आहेत. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
MPSC Students Protest in Pune : पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान
मागील अनेक वर्षांपासून पुण्यात किंवा राज्यभर विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. दोन वर्ष कोरोना असल्याने या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षांच्या तारखा देखील लवकर जाहीर झाल्या नाहीत. या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतापले होते. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या आहेत प्रमुख मागण्या-
- नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा.
- पॅटर्न लागू करण्याची घाई करु नये.
- अभ्यास करण्यासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा.
- नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रवार आधारित आहे. त्यामुळे पुस्तकं उपलब्ध नाहीत. त्यात सुधारणा करण्यात यावी
संबंधित बातम्या-