पुणे : पुण्यातील (Pune Crime News) नामांकित कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये चाकूने झालेल्या हल्ल्यात शुभदा कोदारे (Shubhada Kodare) (28 वर्षे) या तरुणीचा मृत्यू झाला आहे. अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने उपचारांच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. शुभदाच्या (Shubhada Kodare) सहकाऱ्यानेच तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मंगळवारी सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा (28 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. मात्र या वादाला पैशांची किनार असल्याने संतापलेल्या कृष्णाने शुभदावर हल्ला केला.
शुभदाने कृष्णाकडून खोटं कारण सांगून घेतलेले चार लाख रुपये
विमाननगर येथील एका कंपनीत काम करत असताना, कृष्णा आणि शुभदा या दोघांची 2022 मध्ये चांगली ओळख झाली. कृष्णा हा लिपिक पदावर काम करायचा तर, शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची. पुढे दोघांचा चांगली ओळख झाली मैत्री झाली. याच काळात शुभदाने वडील आजारी असल्याचे कारण सांगत त्यांच्या उपचारांसाठी कृष्णाकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले होते. तिच्या वागण्यामुळे आणि सतत पैशांची मागणी करणयामुळे कृष्णाला संशय आला.
त्यानंतर त्याने अडीच महिन्यांपूर्वी थेट कराडमध्ये जाऊन शुभदाच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी शुभदाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली आपल्याकडून पैसे घेतल्याचे त्याला समजले. तिचे खोटे बोलणे कृष्णाच्या जिव्हारी लागले. त्याच कारणातून त्याने शुभदावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या शुभदाचा उपचाराच्या दरम्यान मंगळवारी (दि. 7) मृत्यू झाला. याप्रकरणी शुभदा हिची बहीण साधना कोदारे (वय 26, रा. काळेवाडी फाटा, पिंपरी-चिंचवड)ने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28, रा. खैरैवाडी, शिवाजीनगर, मूळ यूपी) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकमेकांना पाहून हसले अन्...
कृष्णाला शुभदाची कामावर येण्या-जाण्याची वेळ माहिती होती. शुभदाने आपल्याला खोटं सांगून पैसे घेतले म्हणून कृष्णाच्या डोक्यात मंगळवारी वेगवेगळे विचार थैमान घालत होते. शुभदाची त्या दिवशी साडेसहा वाजता ड्युटी सुरू होणार होती. त्यामुळे सहा वाजता ती बसने आली होती. अर्घा तास ड्युटीला आणखी वेळ असल्यामुळे ती एका मैत्रिणीसोबत कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये थांबली होती. कृष्णाने तिला बसमधून उतरताना पाहिलं होतं. दोघांची नजरेला नजर झाली, त्यांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केलं. मात्र, कृष्णाच्या डोक्यात वेगळंच सुरू होतं. त्याने शुभदा जवळ येताच माझ्या पैशाचं तू काय केलंस, असा प्रश्न करत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही समजण्याआधीच त्याने चाकू काढून शुभदा हिच्या उजव्या हातावर, कोपरावर चार ते पाच वार करून
तिला गंभीर जखमी केलं. तिला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोदारे हिच्यावर तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजा याने हल्ला केला. पुणे शहरातील येरवडा भागातील एका आयटी कंपनीत ही घटना घडली. यामध्ये शुभदा ही गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.