पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad mohol) याची गेल्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर, त्याची गँग काहीही विस्कळीत झाली असली तर त्याच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न त्याच्या गटातील सदस्यांकडून होत असल्याचं सातत्याने समोर येत आहे. येथील गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कोथरूड येथील सुतारदरा भागात शरद मोहोळ याच्या घराजवळच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून पुणे (Pune) पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्याच आठवड्यात शरद मोहोळ टोळीतील दोघांना अटक केली होती. आता, आणखी एका सदस्याला पिस्तुलसह अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून संबंधित आरोपीची सखोल चौकशी सुरू असून त्याने जवळ बागळलेले पिस्तुल कोणत्या उद्देशाने ठेवले होते, याचाही तपास घेतला जात आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखाने शरद मालपोटे आणि संदेश कडू नामक दोन जणांना गेल्याच आठवड्यात अटक केली होती. विशेष म्हणजे या दोघांच्या ताब्यातून दोन पिस्तूलही जप्त करण्यात आले होते. आता शरद मोहोळ गटाच्या विकी चव्हाण नावाच्या आणखी एका सदस्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात अटक केलेल्या गुन्हेगारांच्या अटकेनंतर पोलिसांकडून इतरही सदस्यांचा शोध सुरू होता. त्यातूनच आज अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
पोलिसांनी आयटी हिंजवडी परिसरातून शरद मोहोळ टोळीच्या सदस्याला पिस्तुलासह बेड्या ठोकल्या आहेत. विकी चव्हाण असं त्याचं नाव असून हिंजवडी पोलिसांनी त्याला मेझा नाईन हॉटेल जवळून अटक केली. हॉटेल मेझा नाईनजवळ काळ्या रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती हा कमरेला पिस्तूल लावून दुचाकीवर फिरत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विकी चव्हाणला ताब्यात घेतलं. तेंव्हा विकीच्या कमरेला दोन पिस्तुले आणि खिशात चार जिवंत काडतुसे मिळून आली. या घटनेप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी चव्हाण हा शरद मोहोळ टोळीसाठी काम करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. अद्याप त्याच्यावर किती गुन्हे आहेत, हे समजू शकलेलं नाही. मात्र, विकी चव्हाणने पिस्तुल नेमकी कशासाठी बाळगली हे अद्याप समजू शकलेलं नाही, त्याचा तपास देखील पोलीस करत आहेत.
हेही वाचा
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय