(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिल्ह्याबाहेर फिरायला गेल्यास परतल्यानंतर 15 दिवस क्वॉरन्टीन करावं लागेल : अजित पवार
"फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परतल्यानंतर 15 दिवस क्वॉरन्टीन करावं लागेल," असं अजित पवार म्हणाले. तसंच पुण्यातील वीएण्ड लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनीसांगितलं.
पुणे : निर्बंध शिथील झाल्यानंतर जिल्ह्याबाहेर फिरायला जाणाऱ्यांनाही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे. "फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परतल्यानंतर 15 दिवस क्वॉरन्टीन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे," असं अजित पवार म्हणाले. तसंच परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळ्या कोरोना लसीचे डोस घेऊ नये, असं कळकळीचं आवाहन अजित पवार यांनी केलं. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
अजित पवार म्हणाले की, "अनेक जण राज्याच्या बाहेर फिरायला जात आहेत. अशा लोकांना जिल्ह्यात परत आल्यानंतर पंधरा दिवस कॉरन्टीन करावं लागेल, तसे आदेश काढेव लागतील, तज्ज्ञांनी तसा सल्ला दिला आहे."
पुण्यातील वीएण्ड लॉकडाऊन कायम
पुण्यातील वीएण्ड लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे पुण्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळता इतर दुकानं बंद राहणार आहेत.
"कोरोनाचं संकट हळूहळू कमी होत आहे. मात्र नागरिक शनिवार आणि रविवारी मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आम्ही सर्व प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र चर्चा करुन निर्णय घेतला आहे की, पुण्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळून इतर दुकानं बंद राहतील. पुढच्या आठवड्यात देखील ही स्थिती राहिल. परिस्थिती आटोक्यात आली तर कदाचित बदल केले जातील," असं अजित पवार म्हणाले.
"सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, उस्मानाबाद या सारख्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण जात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेले 53 टक्के कोरोना रुग्ण 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 43 टक्के मृत्यू हे कोणतीही को-मॉर्बिडीटी नसलेल्या नागरिकांचे आहेत. तर 20 टक्के मृत्यू हे 31 ते 45 वयोगटातील आहे," असं अजित पवार यांनी सांगितलं.