Gajanan Marne :   कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याला पुणे विशेष न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. 29 ऑक्टोंबर पर्यंत गज्या मारणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र मोक्का कोर्टाने त्यांना न्यायलायीन कोठडी आली आहे. वाई येथून ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी गज्या मारणेला आणि त्याच्या इतर साथीदाराला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. 20 कोटीच्या खंडणी प्रकरणी गज्या मारणे याला अटक झाली आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्यातील वाई जवळच्या ॲड.विजयसिंह ठोंबरे पाटील यांना फार्महाऊस वर भेटण्यासाठी आले असताना पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. 


28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती
अटक केल्यानंतर गुंड गज्या मारणे याच्यासह दोघांना मोक्का न्यायालयाने 28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला होता. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मारणेला रविवारी साताऱ्यातील वाई परिसरातून ताब्यात घेतले होते. मागील अनेक दिवसांपासून गज्या मारणे पोलिसांच्या रडारवर होता. अनेकदा तो फरारदेखील झाला होता. मात्र पुणे पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आलं होतं. आता पुणे विशेष न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.


काही दिवसांपूर्वी याच टोळीतील कोल्हापूरमधील सराईत गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकरला पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतलं होतं. इंदूरमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यात गाजलेल्या खूनाच्या बदल्यात खून प्रकरणातील प्रकाश बांदिवडेकर सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.  सांगली आणि पुण्यात शेअरचा व्यवसाय करणाऱ्याचं वसुलीसाठी अपहरण केलं होतं. गुंड गज्या मारणेच्या टोळीने 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यांना जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती.


खंडणी प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई
खंडणी प्रकरणात सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप , हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील, अमर शिवाजी किर्दत, फिरोज महंमद शेख, गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे, रुपेश कृष्णाराव मारणे, संतोष शेलार , मोनिका अशोक पवार, अजय गोळे, नितीन पगारे, प्रसाद खंडागळे यांच्यावर अपहरण, मारहाण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली होती.