Pune Hills :   पुणे रनिंग ग्रुपच्या (Pune Running Groups) वतीने वेताळ टेकडीवर रविवारी ‘सेव्ह पुणे हिल्स’  (SAVE PUNE HILLS)मोहिमेचा एक भाग म्हणून ‘रन्स फॉर द हिल्स’ या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे शहरात अनेक टेकड्या आहेत. या टेकड्यांवर अनेक जातीच्या वनस्पती आढळतात. या वनस्पती पर्यावरणाचं जतन करण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. शिवाय टेकड्यांवर अनेक पक्षीदेखील वास्तव्यास असतात. त्यामुळे या टेकड्यांचं जतन करण्यासाठी पुणे रनिंग ग्रुप सरसावला आहे. 


वेताळ टेकडी आणि त्यावरील जंगल अनेक प्रकारे पुणे शहराला मदत करतं. टेकडी हे शहराच्या शेवटच्या उरलेल्या पर्यावरणीय संपत्तीपैकी एक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचे जतन करणं गरजेचं आहे. त्यात केवळ शहरी जंगलच नाही तर त्यात पुण्याच्या हवामान बदलावरही या टेकड्यांमुळे मोठा परिणाम होतो. त्यामुळे शहरातील पर्यावरणीय आणि शहराच्या भल्यासाठी असलेल्या नैसर्गिक गोष्टी जपल्या पाहिजेत. त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे, या हेतूने ही मॅरेथॉन काढण्यात येणार आहे. 


पुणे महानगरपालिकेने (PMC) लॉ कॉलेजच्या उतारावर टेकडी-बाल भारती रोडवर तीन प्रकल्पांची योजना आखली आहे. सुतारधारा (पौड रोड), जनवाडी (गोखलेनगर) आणि पंचवटी येथे बाहेर पडणारे दोन बोगदे आणि लॉ कॉलेज उतार ओलांडून HCMTR/ निओमेट्रो उन्नत रस्ता यांचा या प्रकल्पामध्ये समावेश आहे. जंगल, जैवविविधता, भूजल आणि आपल्या शहराची सांस्कृतिक ओळख आणि प्रगती याच्या किंमतीला आपण ‘विकास’ म्हणू शकतो का? पुण्यातील नागरिकांनी एकत्र येऊन पीएमसीला हे पर्यावरणावर परिणाम करणारे प्रकल्प रद्द करण्याचे आवाहन केले आहे आणि त्याऐवजी कार्यक्षम, योग्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत गुंतवणूक करावी, असं त्यांनी निवेदनात म्हटले आहे.


यासाठी पुणे रनिंग ग्रुपतर्फे रविवारी सकाळी 6 वाजता एआरएआय गेटबाहेर वेताळ टेकडी येथे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ते पुण्याच्या टेकड्या वाचवण्यासाठी यलो रिबन मोहिमेला प्रोत्साहन देईल, असं या गृपने सांगितवे आहे. ही "ग्रीन रन" असेल, त्यामुळे तेथे बिब, पिन, पेपर कप, पाण्याच्या बाटल्या, फ्लेक्स बॅनर किंवा मोठ्या आवाजातील गाणी असणार नाही. त्यांच्याच काही स्वयंसेवकांची टीम मागे उरलेला कचरा उचलेल. त्यामुळे टेकड्यांवर कचरा होणार नाही, असंही त्यांच्यावतीने सांगण्यात आलं आहे.