पुणे : कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितींत जाती धर्माच्या भिंती नष्ट झाल्याचे चित्र सध्या समाजात दिसत आहे.जाती-धर्माचा विचार न करता प्रत्येक नागरिक आपापल्या परीने मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे.. पुण्यातूनही हिंदू-मुस्लिम सलोख्याचे एक उदाहरण समोर आले आहे. मागील वर्षभरापासून पुण्यातील एक मुस्लिम संस्था जाती-धर्माचा विचार न करता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे.आजवर या संस्थेने हजारो मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यातील अनेक मृतदेह हे हिंदू धर्मीयांचे होते आणि या सर्वांनी हिंदू धर्माच्या धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे आजवर अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहे.


पुण्यातील जावेद खान उम्मत संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षभरापासून ते कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत आहेत. तीन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून ते यापूर्वी बेघर आणि बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत होते. परंतु मागील वर्षभरापूर्वी आलेल्या कोरोनामुळे अनेकजण मृत्युमुखी पडू लागले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणी धजावत नव्हते.अशा परिस्थितीत जावेद खान यांनी पुढाकार घेतला. कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करू लागले.


जावेद खान यांच्या संस्थेत 40 सदस्य आहेत. हे सर्व सदस्य मुस्लिम धर्माचे आहेत. सध्या रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे यातील बहुतांश जणांचा रोजा असतो. रोज सकाळी सेहरा करून हे सर्वजण बाहेर पडतात.. सकाळी दहा वाजल्यानंतर यांचा दिनक्रम सुरू होतो. अनेक रुग्णालयातून, मयतांच्या नातेवाइकांकडून त्यांना फोन येतात. त्यानंतर रुग्णवाहिका घेऊन जाणे, मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवणे, स्मशानभूमीत चिता रचणे इथपासून ते मुखाग्नी देण्याचे काम करतात. हिंदुधर्मीय व्यक्तीचा मृतदेह असेल तर त्यावर हिंदू धर्मा रीतीरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार केले जातात. 


सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि रमजान महिन्यात इतरांची सेवा करणे हे पवित्र कार्य मानले जाते. त्यामुळे उम्मत संस्थेच्या या कामकाजात अनेक तरुण येतात सहभागी होतात आणि आणि सेवा देऊन परत निघून जातात. कोरोनाच्या या काळात रक्ताचे नातेवाईकही कोरोनाबाधित मृतदेहाच्या जवळ येण्यास घाबरत असताना जावेद खान आणि त्यांचे सहकारी मात्र कोणतीही भीती न बाळगता हे अत्यसंस्कार करण्याचे पवित्र काम करत आहेत..