अयोध्या : 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलं आहे. या प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. त्यातील 17 आरोपींचं निधन झालं आहे. या सर्वांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली.


या आरोपींची निर्दोष मुक्तता


लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे, ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर


या आरोपींचं झालं आहे निधन


बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, आचार्य गिरीराज किशोर, विष्णु हरी डालमिया, महंत अवैद्यनाथ, महंत परमहंस दास, महामंडलेश्वर जगदीश मुनि, बैकुंठ लाल शर्मा प्रेम, डॉ सतीश नागर , मोरेश्वर साळवे (शिवसेना नेता) , डीवी रे (तत्कालीन एसपी), विनोद कुमार वत्स, रामनारायण दास, हरगोबिंद सिंह, लक्ष्मी नारायण दास महात्यागी, रमेश प्रताप सिंह, विजयराजे सिंधिया.


लालकृष्ण आडवाणी यांनी आनंद व्यक्त केला 


कोर्टाचा हा निकाल आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आडवाणी यांनी म्हटलं आहे की, ''आजचा हा निकाल अत्यंत महत्वपूर्ण आहे. आम्ही सर्वजण यामुळं अत्यंत आनंदी आहोत. ज्यावेळी निकाल ऐकला त्यावेळी जय श्रीराम म्हणून आम्ही या निर्णयाचं स्वागत केलं" असं आडवाणींनी म्हटलं आहे.


आता भारतात असा कुठला वाद होऊ नये - इक्बाल अंसारी 
6 डिसेंबर 1992 रोजी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यासंदर्भात पक्षकार इक्बाल अंसारी यांनी म्हटलं आहे की, आम्ही कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो. आम्ही भारतीय मुस्लिम आहोत. कोर्ट साक्षीदाराच्या आधारे निर्णय देतं. सीबीआय साक्षीदार देण्यास कमी पडलं. त्यामुळं निर्णय कोर्टानं दिला आहे. आता वाद संपला आहे ही चांगली गोष्ट आहे. आता भारतात असा कुठला वाद होऊ नये. देशात माणूस म्हणून माणसांकडे पाहावं. संविधानाच्या मार्गाने चालावं. देव आणि अल्लाहच्या सांगितलेल्या रस्त्यावरुन लोकांनी चालावं. हिंदू मुस्लिम वाद निर्माण होऊ नये, असं अन्सारींनी म्हटलं आहे.


32 आरोपींपैकी 26 आरोपी न्यायालयात उपस्थित


न्यायाधीश एस. के. यादव यांच्या न्यायालयात 32 आरोपींपैकी 26 आरोपी न्यायालयात उपस्थित होते. अनुपस्थित आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश दिले. या सहा जणांमध्ये लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सहा जण गैरहजर होते. एक सप्टेंबर रोजी हा निकाल पूर्ण झाला असल्याची माहिती होती. दोन हजार पानांचं निकालपत्र असल्याची माहिती आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने फैसला सुनावला. या प्रकरणात एकूण 49 आरोपी होते, ज्यापैकी 17 आरोपींचा मृत्यू झाला आहे.


मोठी बातमी : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष 


6 डिसेंबर 1992 ते आजपर्यंत संपूर्ण प्रकरण 


1949-रामाच्या मुर्ती बाबरी मशिदीत प्रकटल्या 
डिसेंबर 1949 मध्ये, भगवान रामांच्या मूर्ती मशिदीच्या आत प्रकटल्या किंवा कुणीतरी आणून ठेवल्या. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी खटले दाखल करण्यात आले. हाशिम अन्सारी यांनी मुस्लिमांकरिता खटला दाखल केला आणि पुढील वर्षांत निर्मोही अखाडा यांनी हिंदूंसाठी एक खटला दाखल केला. सरकारने या जागेला वादग्रस्त घोषित करून त्यास कुलूप लावले. रामजन्मभूमी न्यासचे प्रमुख महंत परमहंस रामचंद्र दास यांनी 1989 मध्ये जागेच्या मालकी हक्काची याचिका दाखल केली.


1984 - विश्व हिंदू परिषदेची जन्मभूमी वादात उडी  
विश्व जन्म परिषद रामजन्मभुमी आंदोलन सुरू करण्यासाठी एक गट स्थापन केला. भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना त्या जागेवर भव्य ‘राम मंदिर’ बांधण्याच्या मोहिमेचा नेता आणि चेहरा बनविण्यात आले आहे. 1986 साली फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी विवादित जागेचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिले. हिंदूना मशिदीत प्रवेश करुन पूजा करण्याची परवानगी देण्यात आली.


1990- बाबरी मशिद पाडण्याचा पहिला प्रयत्न 
तत्कालीन भाजप अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वादग्रस्त ठिकाणी राम मंदिर बांधण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी देशभर रथयात्रा काढली. या वर्षी व्हीएचपी स्वयंसेवकांनी बाबरी मशीदचे अंशतः नुकसान केले. केंद्रात जनता दलाचे सरकार असताना मुलायमसिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 30 ऑक्टोबर 1990 रोजी यादव यांनी बाबरी मशिदीकडे निघालेल्या जमावावर गोळीबार करण्याचे पोलिसांना आदेश दिले. सरकारच्या म्हणण्यानुसार त्यात 16 कारसेवकांचा मृत्यू झाला. ह्या घटनेच्या दोन वर्षानंतर 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद पाडण्यात आली.


घटनेनंतर दोन एफआयआर नोंदविण्यात आले. प्रथम गुन्हा क्रमांक 197/1992 आणि दुसरा 198/1992 होता. ह्यात हजारो अज्ञात कारसेवकांवर दरोडे, दुखापत करण्याचा प्रयत्न, सार्वजनिक पूजा स्थळे अपवित्र करणे, धर्मिक कारणास्तव दोन गटांत वैर वाढविणे इत्यादी आरोप ठेवले गेले. राम कथा कुंज सभा मंचवरून द्वेषपूर्ण भाषणे दिल्याबद्दल भाजप, व्हीएचपी, बजरंग दल आणि आरएसएसच्या आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातले आठ आरोपी होते लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल, विनय कटियार, उमा भारती, साध्वी ऋुंतुबरा, मुरली मनोहर जोशी, गिरीराज किशोर आणि विष्णू हरी डालमिया. या आठ पैकी अशोक सिंघल आणि गिरीराज किशोर यांचे निधन झाले आहे. एफआयआरमध्ये कलम 153-ए, 153-बी आणि कलम 505 आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.


लिबरहान कमिशन नियुक्त
बाबरी मशिद पडल्याच्या दहा दिवसानंतर 16 डिसेंबर रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. लिबरहान यांची नेमणूक करण्यात आली. लिबरहान यांनी मशिद पडल्याच्या घटनाक्रमाची चौकशी करायची होती. गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेत सरकारने म्हटले होते की आयोगाने आपला अहवाल 3 महिन्यांच्या आत सादर करावा. पण आयोगाला 48 वेळा मुदतवाढ देण्यात आली. आयोगावर आठ कोटींपेक्षा जास्त खर्च झाल्यावर दीड दशकांनी म्हणजे 2009 साली अहवाल सादर करण्यात आला.


न्यायालयीन प्रक्रियेला सुरूवात


1993 साली खटल्यांचा निवाडा करण्यासाठी ललितपुरात विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. परंतु नंतर राज्य सरकारने अलाहाबाद हायकोर्टाशी सल्लामसलत करून ललितपूर येथील विशेष न्यायालयातून लखनौच्या विशेष न्यायालयात या प्रकरणांची सुनावणी हलविण्यासाठी अधिसूचना जारी केली. एफआयआर 197 चा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता आणि सुनावणी लखनौला हलविण्यात आली. तर एफआयआर 198 चा खटला रायबरेलीच्या विशेष न्यायालयात चालविला जायचा आणि त्याची चौकशी राज्य सीआयडी करत होते. ह्या दोन गुन्ह्यात आणखी काही कलमे पुन्हा जोडण्यात आली होती.


1993 साली सीबीआयची चार्जशीट 
एका महिन्यानंतर, 5 ऑक्टोबर 1993 रोजी सीबीआय एकत्रित आरोपपत्र दाखल केले. त्यात एफआयआर 198 चा समावेश होता. ह्या आरोपपत्रात मुळच्या आठ आरोपींसह बाळासाहेब ठाकरे, कल्याणसिंग, चंपत राय बंसल, धरम दास, महंत नृत्य गोपाल दास आणि इतर आरोपींची नावे जोडण्यात आली. सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्राप्रमाणे मशीद पाडण्याच्या एक दिवस आधी बजरंग दलाचे नेते विनय कटियार यांच्या निवासस्थानी छुप्या बैठकीबद्दल बोलले गेले होते, “ज्यामध्ये वादग्रस्त रचना पाडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.” या बैठकीत आरोपपत्रानुसार अडवाणी आणि अन्य सात नेते उपस्थित होते. 8 ऑक्टोबरला उत्तर प्रदेश सरकारने सगळे गुन्हा एकत्रित करणारी नवीन अधिसूचना जारी केली. बाबरी मशीद पाडण्याशी संबंधित सर्व खटले लखनौमधील विशेष कोर्टाद्वारे चालवले जावू लागले.


शेवटी सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्या आधारे कोर्टाने मानले की लालकृष्ण अडवाणी यांच्यासह बाळासाहेब ठाकरे आणि इतर नेत्यांविरूद्ध कट रचल्याचा आरोप ठेवण्यासाठी सबळ पुरावा होता. लखनौच्या विशेष न्यायाधीशांनी आदेश दिला की, गुन्हेगारी कट रचल्याचा आरोपाखाली सर्व आरोपींविरोधात आयपीसीच्या इतर विविध कलमांद्वारे प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


न्यायालयानं काय म्हटलंय
आदेशानुसार असे म्हटले आहे: "वरील चर्चेतून हा निष्कर्ष काढला गेला आहे की सध्याच्या प्रकरणात आरोपींनी बाबरी मशिद पाडण्याचा कट 1990 साली रचला आणि 6 डिसेंबर 1992 साली तो पूर्ण केला. अडवाणी आणि इतर व्यक्ती वादग्रस्त मशिद पाडण्याचा कट सतत रचत होते."  या आदेशाला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर आव्हान दिले गेले. उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या प्रशासकीय चुकांमुळे आरोपीवर लावलेले आरोप चुकीचे आहेत असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला. दोन आरोपपत्र एकत्रित करणे चुक होते हा मुद्दा न्यायालयाने मानला आणि कट रचल्या बद्दलचे प्रकरण रायबरेली न्यायालयाकडे वर्ग केले. तिथे अडवाणींसह इतरांविरोधात खटला चालवावा आणि सीबीआयनी पुरावे द्यावेत असे आदेश दिले.


2003 साली सीबीआयने आठ आरोपींविरोधात पूरक आरोप दाखल केले. त्यात आडवाणी इतरांच्या भाषणामुळे मशिद पडली हे सिद्ध करण्यात सीबीआयला अपयश आले. रायबरेली कोर्टाने आडवाणी यांचा गुन्ह्यातून मुक्त करण्याचा अर्ज कोर्टाचा हा आदेश बाजूला ठेवत अडवाणी आणि इतरांवर खटला चालू ठेवला. खटला पुढे सरकला, परंतु गुन्हेगारी कट रचल्याचा आरोपातून आडवाणी आणि इतरांना वगळण्यात आले. 2005 साली रायबरेली कोर्टाने या प्रकरणात आरोप निश्चित केले आणि 2007 मध्ये पहिली साक्ष नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यावर तब्बल 15 वर्षांनी. आता आज अखेर या प्रकरणी निकाल लागला.