पुणे :  शेतातील उभ्या पिकावर बसलेली पाखरं उठवण्यासाठी शेतकरी गोफणीचा उपयोग करतो . पण आता वावरातील ही गोफण सातासमुद्रापार निघाली आहे . युरोपातील स्पेनमध्ये  गोफणीच्या साहाय्याने निशाणा साधण्याची वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये 34 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारताची टीम या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणार आहे . त्यासाठी या टीमचा पुण्यात कसून सराव सुरू आहे. 


पुण्यात मार्शल आर्टचे प्रशिक्षक म्हणून काम करणारे कुंडलिक कचालेंना  मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या  परभणी जिल्ह्यातील मूळ गावी जावं लागलं. तेव्हा त्यांचे शेतकरी वडील गोफणीचा उपयोग रात्री - अपरात्री येणारी जनावरं आणि चोरांच्या विरुद्ध शस्त्रासारखा करत असल्याचं त्यांनी पाहिलं. गमंत म्हणून त्यांनीही गोफण चालवायला सुरुवात केली आणि सोबतच्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी गोफण शिकवायला सुरुवात केली . 


त्यांनी गोफण चालवण्याचं तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी इंटरनेटवर सर्च केलं असता युरोपातील स्पेनमध्ये गोफणीची स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं त्यांना समजलं. स्पेनमध्ये ही स्पर्धा भरवणाऱ्या आयोजकांशी त्यांनी संपर्क साधला असता त्यांनी कुंडलिक कचाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचं आमंत्रण दिले. 


स्पेनमध्ये होणाऱ्या स्लिंग थ्रो वर्ल्ड कपमध्ये इतर 33 देशांबरोबर भारताचं प्रतिनिधित्व करायचं आणि त्यासाठी अकरा जणांची टीम तयार करायचं त्यांनी ठरवलं . या टीममधील सर्व अकरा जण शेतकरी कुटुंबातील आहेत . त्यामुळे गोफणीशी यांचा कायम संबंध आला आहे . 


 गोफणीच्या स्पर्धा आंतररराष्ट्रीय स्तरावर दगड आणि सिंगल टेनिस बॉल अशा दोन प्रकारात भरवल्या जातात. पुरुषांना वीस मीटर शॉर्ट आणि तीस मीटर लॉन्ग अशा दोन अंतरारांवरून गोफणीच्या साहाय्याने निशाणा साधायचा असतो तर महिलांना शॉर्ट दहा मीटर आणि लॉन्ग वीस मीटर अशा दोन अंतरांवरून नेम साधायचा असतो . त्यासाठी प्रत्येकाला त्याला सोयीची अशी टेक्निक वापरायची मुभा असते . 


 येत्या 12 ऑक्टोबरला अकरा जणांची ही टीम स्लिंग थ्रो वर्ल्ड कपसाठी रवाना होणार आहे . त्यासाठी या टीमचा गेले काही महिने पुण्यात कसून सराव सुरू आहे.  या टीमला स्पेनला जाता यावं आणि वर्ल्डकपमध्ये सहभागी होता यावं यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढं केला आहे . पण आपल्याकडे या गोफणीचा समावेश खेळामध्ये झाल्यास अनेक गोष्टी सोप्या होतील आणि अनेकांना संधी मिळेल असं या खेळाडूंना वाटतं . 


 आपल्याकडे मध्ययुगात गोफणीचा उपयोग युद्धांमध्ये शस्त्र म्हणून होत असल्याचे दाखले आहेत . युरोप आणि इतर देशांमध्येही देखील  पिकांच्या रक्षणाबरोबरच शस्त्र म्हणून या गोफणीचा उपयोग होत होता . युरोपात खेळाच्या रूपाने ती परंपरा  अजूनही जपण्यात आलीय  . आपल्याकडेही  गोफणीचा समावेश समावेश खेळांमध्ये झाल्यास कृषी संस्कृतीशी नातं सांगणारा हा प्रकार देशी खेळ म्हणून लोकप्रिय होईल यात शंका नाही .