मुंबई : डॉ. द. बा देवल यांचे पुण्याच्या नर्सिंग होममध्ये दोन दिवसांपूर्वी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांना त्यांची मनस्थिती दुर्बल होत गेल्याने महिन्याभरापूर्वीच विशेष नर्सिंगहोममध्ये दाखल केले होते. त्यांना अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश झाला होता. इथं त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारात सुधारणाही दिसत होत्या. मात्र, ठसका लागत असल्याने त्यांना फूड पाईप लावण्यात आला होता. दरम्यान, तेथे त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि तशातच मृत्यू ओढवला. देवल यांच्यावर डॉ. निनाद बस्ते आणि त्यांची विद्यार्थी असलेली डॉ. स्वाती देशमुख उपचार करत होते.
देवल केइएम रुग्णालयातून अॅनास्थेशिया विभागप्रमुख व त्या विषयाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. ते मूळ इंदूरचे. त्या गावची रसिकता व गुणवत्ता त्यांच्या अंगी ठासून भरली होती. ते स्वत: विविध कलांमध्ये पारंगत होते. त्यात लाकुडकामापासून बासरीवादन, संगीतरचना असे सर्व छंद त्यांना होते. कवितांचे तर फारच वेड. निवृत्तीनंतर त्यांनी बराच काळ किहीम परिसरात काढला. तेथील भजनमंडळींतही ते रमून जात.
देवल विचाराने ठाम होते. महापालिका रुग्णालयात फूल टायमर व ऑनररी असा वाद डॉक्टरांमध्ये जोरात होता. त्यावेळी ते फूल टायमरांच्या बाजूने चळवळीत उतरले. महापालिकेच्या वैद्यकीय सेवेचा लाभ गरिबांना होण्यास हवा असा त्यांचा आग्रह असे. त्यांचा मध्य प्रदेशातील दरोडेखोरीसंबंधात अभ्यास होता. त्यांनी काही दरोडेखोरांना भेटून त्यांच्या कहाण्या लिहिल्या आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार अरुणा ढेरे यांच्या हस्ते इंदूरमध्ये सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत झाला होता.
डॉ. देवल यांच्या पत्नी मीना देवल या स्त्री मुक्ती कार्यकर्त्या. त्यांचे निधन दोन वर्षांपूर्वी झाले. देवल यांचा मोठा मुलगा अतुल अमेरिकेत असतो. धाकटा अजित मुंबईमध्ये प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहे. तो संगीताचे अनवट प्रकारचे कार्यक्रम करतो.