Pune News: एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना मध्यरात्री दुथडी वाहत असलेल्या नदीपात्रातून प्रवास करणं भोवलं. रात्री पावने दोनच्या सुमारास नदीपात्रातून प्रवास करत होते. त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि गाडी वाहून जात एस एम जोशी पुलाखाली अडकली. सुदैवाने यात कोणतहीती जीवितहानी झाली नाही. मध्यरात्री नदीपात्रात गाडी वाहून जात आहे अशी माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांच्या प्रसंगावधानामुळे या एकाच कुटुंबातील पाचही व्यक्तींचे प्राण वाचले आहे. या कामगीरीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांचं सर्वत्र कौतुक होत आहे. पुणे महापालिकेच्या वतीने त्या जवानांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.
नक्की काय घडलं?
खडकवासला धरण संपुर्ण भरल्यामुळे काल नदीपात्रास विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुठा नदीचं पात्र दुथडी वाहत होतं. कर्वे रोडजवळील एस एम जोशी पुलाखाली देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. रजपूत विटभट्टी कडून गाडी पात्रातील रस्त्याने जात असताना पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याऺची गाडी वाहून जात गरवारे पूलाखाली अडकली होती. गाडी वाहत जाताना पाहून कुटुंबीय भेदरले होते. यावेळी नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात वाहून जात असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. एरऺडवणा अग्निशमन केऺद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी रोप, लाईफ जॅकेट च्या साह्याने नदी पात्रात उतरले. दलाच्या जवानांनी त्वरित समयसूचकता दाखवत गाडी जवळ पोहचत एकाच कुटुंबातील पाचही जणांचे प्राण वाचवले आहे. पालघरहून पुण्यात वाणी कुटुंब नातेवाईकांकडे आलं होतं. वऺचिका वाणी, प्रिया वाणी, कुणाल वाणी, कपिल लाल वाणी, कृष्णा वाणी अशी पाच व्यक्तींची नावे आहेत.
पुण्यात गेले तीन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे तीन दिवस मुसळधार पाऊस पडला. पुण्याजवळील काही धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातदेखील 100 टक्के पाणीसाठा झाल्याने काल सायंकाळी 4 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 18 हजार 491 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता. मुठा नदीत हा विसर्ग केल्यामुळे पुण्यातील डेक्कन परिसरातील बाबा भीडे पूल पाण्याखाली गेला होता. त्यासोबतच नदी पात्रातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. नदीपात्रात असलेल्या गाड्या आणि ढोल ताशापथकांचे मंडपदेखील पाण्याखाली गेले आहे.