पुणे : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या जंगली महाराज (D S kulkarni) रस्त्यावरील कार्यालयावर ईडीने (ED) नजर ठेवली आहे. आज सकाळपासून कार्यालयाजवळ ईडीचे आधिकारी उभे आहेत. ईडीची दोन पथकं पुण्यात दाखल झाली आहे. या पथकांकडून कारवाई वजा नजर केली जात आहे. ईडीचे अधिकारी व केंद्रीय तपास यंत्रणेचे विविध पोलीस या कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत. ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके हे काही दिवस जेलमध्ये देखील होते. विविध पोलीस स्थानकांमध्ये डीएसके यांचा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
डी. एस. कुलकर्णी यांची संपत्ती आधीच ईडीने जप्त केली आहे. त्यातील जंगली महाराज रोडवरील कार्यालय आज उघडण्यात आलंय. न्यायालयाच्या परवानगीने आणि ईडी आधिकाऱ्याच्या देखरेखेखाली हे कार्यालय उघडण्यात आलं आहे. ऑफिस तसेच बंगला उघडून त्याठिकाणी असलेले कागदपत्र डी. एस. कुलकर्णी यांनी ताब्यात घेण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती डीएसके यांनी कोर्टात केली होती. त्यानुसार डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी हेमांगी त्यांच्या जंगली महाराज रोडवरील ऑफिसमध्ये आल्या आहेत. याठिकाणी ED च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालयातून काही कागदपत्र डीएसकेंनी घेतले.
आदेशात नेमकं काय आहे?
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बंगल्यात आणि कार्यालयात जाण्यास दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना मुंबई येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंगला आणि कार्यालयात असलेले कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यासाठी डीएसके यांनी याबाबत अर्ज केला होता.ईडीने पुरेशा कर्मचाऱ्यांसह डीएसके यांचे निवासस्थान आणि कार्यालय उघडावे. डीएसके आणि कुटुंबीयांना त्यात प्रवेश देवून त्यांनी त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करावीत. या सर्व प्रक्रियेचा पंचनामा करून कागदपत्रांच्या योग्य वर्णनासह यादी नोंदवून ठेवावी.ईडी आणि डीएसके यांनी या आदेशाच्या पूर्ततेचा अहवाल 15 दिवसांत सादर करावा. ईडी आणि डीएसके असे दोघेही प्रवेश आणि कागदपत्रे घेतानाचे व्हिडिओ शूटिंग घेऊ शकता. कागदपत्रे घेतल्यानंतर बंगला आणि कार्यालय पुन्हा बंद करण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pm Narendra Modi : तारीख ठरली! मुरलीधर मोहोळांसाठी पुण्यात 'या' दिवशी पंतप्रधान मोदींची सभा