पुणे: दिवाळीतील टिकल्या वाजविण्याचे पिस्तूल उगारुन दहशत माजवण्याची घटना नुकतीत मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव पूल परिसरात घडली होती. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दहशत माजविणाऱ्या तरुणांचा शोध घेतला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून अक्षय अंकुश गायकवाड (वय 27, रा. स्नेह विहार सोसायटी, दांगट पाटील नगर, शिवणे, एनडीए रस्ता), सुनील चंद्रकांत शिंदे (वय 28, रा. रामनगर, वारजे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


दिवाळीत फटाके फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बंदुकीने पुण्यात भर रस्त्यात नागरिकांमध्ये दहशत माजवण्याची घटना समोर आली. वडगाव पूल ते वारजे पुलाच्या दरम्यान ही धक्कादायक घडली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय अंकुश गायकवाड (वय 27, रा. शिवणे, उत्तम नगर) आणि सुनील चंद्रकांत शिंदे (वय 28, रा. वारजे) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. हे दोघे व्यवसायाने पेंटर आहेत. हे दोघे शुक्रवारी (ता. 1) दुचाकीवरून भरधाव निघाले होते. त्यावेळी भर रस्त्यात त्यांनी बंदूक हवेत फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.


घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातारण निर्माण झालं आहे. सिंहगड पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून दिवाळीत फटाके फोडण्यासाठी वापरण्यात येणारी बंदूक सापडली आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले आहे.