Ajit Pawar: ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडामोडीना वेग आला आहे. दिवाळी सण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भाऊबीजेच्या निमित्ताने एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात असतानाच अजित पवारांनी आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा आखलेला आहे. सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत अजित पवार बारामती तालुक्यातील 27 गावांना भेटी देणार आहेत. खरं तर दोन दिवस आधी अजित पवारांनी बारामतीतील 59 गावांचा दौरा आखला होता. परंतु चुकीच्या नियोजनामुळे त्यांनी 29 गावांचा दौरा केला .आणि पुन्हा एकदा आज अजित पवार 27 गावांचा दौरा करणार आहेत. भाऊबीजेच्या निमित्त सुप्रिया सुळे यांना अजित पवार भेटणार का हा प्रश्न विचारला जात असतानाच अजित पवारांनी हा दौरा केल्याने अजित पवार आणि सुप्रिया सुळे भाऊबीजेनिमित्त भेटणार नसल्याचं या दौऱ्यावरून तरी प्रथम दर्शनी दिसते आहे. तर दौऱ्यावेळी अजित पवारांनी मतदारांना साद घातली आहे. लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला पण खुश करा असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला पण खुश करा
बारामती दौऱ्यावर असताना सावळ गावात बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभेला जर सुप्रिया पडली असती तर साहेबांना या वयात कसं वाटलं असतं, म्हणून तुम्ही सुप्रियाला मतदान केलं. त्यामुळे आता विधानसभेला तुम्ही मला मतदान करा. लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला पण खुश करा. साहेब साहेबांच्या परीने विकास करतील मी माझ्या पध्दतीने तालुक्याचा विकास करेल असे अजित पवार म्हणालेत. अजित पवार आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा करीत करीत आहेत. बारामती तालुक्यातील सावळ गावात अजित पवार बोलत होते.
नेमकं काय म्हणालेत अजित पवार?
सावळकरांनो मला माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्या मनात काय होतं ते तुम्ही बोलत नव्हता पण तुमच्या तुमच्या मधला अंदाज कळत होता. काही लोक म्हणायचे साहेब वडीलधारे आहेत. सुप्रियाताई पडल्या तर साहेबांना कसं वाटेल त्यामुळे आपण ताईला मतदान करू. त्यानुसार तुम्ही मतदान देखील केलं ते देखील मी स्वीकारलं. लोकसभेला ताईला मतदान करून तुम्ही साहेबांना खुश केलं. माझाही तुमच्यावर तेवढा अधिकार आहे. लोकसभेला ताई आहे, विधानसभेला दादा आहे. आता विधानसभेला दादाला खुश करा. तालुक्याचा विकास ते त्यांच्या परीने करतील मी माझ्या परीने करेल. माझ्याकडे जास्त आमदार आहेत त्यामुळे पक्ष मला मिळाला मी पक्षाचा अध्यक्ष झालो, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना अजित पवारांनी एक उदाहरण देत पक्षाफुटीवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले समजा सावळगावात एक ट्रस्ट आहे. त्यापैकी त्यामध्ये त्या ट्रस्टचे 15 सदस्य आहेत. त्यातील 11 सदस्य एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला 4 सदस्य मग तो कोणाच्या बाजूला जाणार, तर तो 11 सदस्य असणाऱ्याकडे ट्रस्ट राहणार. त्या ठिकाणी बहुमताला आधार आहे. त्यामुळे कारण नसताना कुठेही भावनिक होऊ नका. आधीपासून मी, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आम्ही आम्ही सगळे मिळून किती वर्ष झाले इथे काम करतो आहे. आम्हाला कोणाचाही अनादर करायचा नाही आम्ही सगळ्यांचा आदर करतो आहे. म्हणून मी मुद्दाम गाव भेट दौरा आखला. मी जवळपास 35 वर्षे काम करतो आहे. तेव्हापासून झालेल्या विकासाचं अजित पवार यांनी पुनरावृत्ती केली आहे.