पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर आता पवार कुटुंबही वेगळं झाल्याचं चित्र दिसून येत आहे. काल(शनिवारी) बारामतीमध्ये अनेक वर्षांची परंपरा असलेला पाडवा सोहळा वेगवेगळा पार पडला आहे. शरद पवार यांचा गोविंदबागेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत साजरा झाला. पाडव्याला अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार मुलं जय आणि पार्थ पवार हे काटेवाडीत पाडवा साजरा करताना दिसले तर बाकीच्या पवार कुटुंबिय गोविंद बागेत भेटले. अशातच आज भाऊबीज निमित्त अजित पवार आणि सुप्रिया सुळे भेटण्याची किंवा एकत्र येण्याची शक्यताही कमी झाल्याचं दिसून येत आहे. कारण अजित पवारांनी बारामतीत दौरा आणि इतर कार्यक्रम आखलेला आहे. जवळपास 12 ते 13 तास अजित पवार दौऱ्यावर असणार आहेत.
दरवर्षी भाऊबीजेनिमित्त पवार कुटुंब एकत्रित
दरवर्षी भाऊबीजेनिमित्त पवार कुटुंब एकत्रित येताना दिसून येतात, काटेवाडीच्या निवासस्थानी भाऊबीजेचा हा कार्यक्रम होतो. काही महिन्यांपुर्वी अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आणि पक्षात फूट पडली, त्यानंतर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आले होते. मात्र या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार आणि शरद पवार हे आणि कुटुंब भाऊबीजेला एकत्र येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अशातच बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मुलाला युगेंद्र पवारांना शरद पवारांनी तिकिट दिलं आहे. बारामतीत अजित पवारविरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे, त्यामुळे राजकारणात एकमेकांविरोधात लढणारे पवार कुटूंब एकत्र येणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
मतभेद असले तरीही पवार कुटुंब एक राहील
पक्ष फुटीनंतर अनेकदा पवार कुटूंबातील व्यक्तींकडून राजकीय मतभेद असले तरीही पवार कुटुंब एक राहील, असं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्षात मात्र वेगळं चित्र निर्माण झालं असल्याने आणि पाडवा वेगळा घेतल्याने आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित भेटणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शरद पवार आणि अजित पवार आज भेटतील याची शक्यता जवळपास धूसर झाली आहे. शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर आहेत. तर अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भाऊबीज होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.
अजित पवारांनी बारामती तालुक्यात गावभेट दौरा
सुप्रिया सुळे आणि अजित पवार भाऊबीजेच्या निमित्ताने एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात असतानाच अजित पवारांनी आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा आखलेला आहे. सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत अजित पवार बारामती तालुक्यातील 27 गावांना भेटी देणार आहेत. खरं तर दोन दिवस आधी अजित पवारांनी बारामतीतील 59 गावांचा दौरा आखला होता. परंतु चुकीच्या नियोजनामुळे त्यांनी 29 गावांचा दौरा केला .आणि पुन्हा एकदा आज अजित पवार 27 गावांचा दौरा करणार आहेत. भाऊबीजेच्या निमित्त सुप्रिया सुळे यांना अजित पवार भेटणार का हा प्रश्न विचारला जात असतानाच अजित पवारांनी हा दौरा केल्याने अजित पवार आणि सुप्रिया सुळे भाऊबीजेनिमित्त भेटणार नसल्याचं या दौऱ्यावरून तरी प्रथम दर्शनी दिसते आहे.