Pune  Bypoll Election: महाराष्ट्रातील दोन विधानसभा (Bypoll election) मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.  पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या (Pune kasba peth chinchwad bypoll election ) पोटनिवडणुकांची  तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. येत्या 27 फेब्रुवारी 2023 रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान होणार आहे आणि 2 मार्चला या पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. 


पुण्यातील कसबा पेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर या जागा रिक्त होत्या. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. आता या दोन्ही जागांसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा रंगली आहे. 


लोकमान्य टिळकांची पणतसून असलेल्या  मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी 1992 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर त्या 17 वर्ष नगरसेवक होत्या. अडीच वर्ष त्या पुण्याच्या महापौर होत्या. त्यानंतर 2019 मध्ये कसबा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 22 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.


पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं 3 जानेवारी रोजी निधन झालं. लक्ष्मण जगताप हे दीर्घ काळापासून आजारी होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार होते.


या दोन्ही नेत्यांचा पुण्याच्या विकासात महत्वाचा वाटा होता. त्यांनी केलेल्या अनेक कामांमुळे पुणेकरांनी त्यांना पसंती दिली होती. मात्र दोघांचंही 15 दिवसांच्या अंतराने निधन झालं. या दोन्ही महत्वाच्या आमदारांच्या निधनामुळे पुण्यात भाजपात पोकळी निर्माण झाली आहे. या दोन्ही जागांवर आता नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार आणि पुणेकर नेमकं कोणाला पसंती देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.


भाजपकडून या नावांची चर्चा-


मुक्ता टिळकांच्या जागेवर भाजपचे माजी नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे यांच्यापैकी एकाला मिळणार की गणेश बीडकर यांचाही विचार होणार याची चर्चा सुरू झाली आहे. या तिघांच्या नावाची चर्चा असली तरीदेखील मुक्ता टिळकांच्या कुटुंबातील कोणाचा विचार होणार का? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीकडून रुपाली ठोंबरेंनी (Rupali Thombare) कसब्यामधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.