NCP MP Supriya Sule: फक्त सत्तेतील दिवस म्हणजे चांगले दिवस नसतात. विरोधातले दिवस फार चांगले असतात, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी व्यक्त केले आहे. मला विरोधात असताना भाषण करायला फार मजा येते, असेही त्या म्हणाल्या. खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर (Indapur) तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर तालुक्यातील कौठाळी येथे विकास कामांचा शुभारंभ केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हळदी कुंकवाचा शुभारंभ केला. या वेळी सुप्रिया सुळे यांनी विधवा महिलांना कुंकू लावून शुभारंभ केला. 


यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, फक्त सत्तेतील दिवस चांगले असतात, असे नाही. विरोधातील दिवसही चांगले असतात. मला विरोधात भाषण करायला आवडते. पण दररोज टीका करून मी थकले आता. हे रोज चुकतात म्हणून रोज टीका करावी लागते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.


विधवा महिला हळदी कुंकू या विषयावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'या महिला खूप अडचणीतून जगत असतात. हळदी कुंकू हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. एकल शब्द वापरावा पण विधवा म्हणू नका. अशा महिला कधी कुंकू लावत नाहीत. म्हणून मी ज्या ठिकाणी जाते त्या महिलांना कुंकू लावायला सांगते.' 






स्थानिक निवडणुकीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'सुनावणी पुढे गेली यात आश्चर्य वाटत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ईडी सरकारला यश मिळणार नाही,  हे मी सातत्याने सांगते आहे. सर्वसामान्य लोकांची अडचण होते, त्यांनी जायचे कुणाकडे? कुठलं ना कुठलं कारण सांगून हे सरकार निवडणूक पुढे ढकलत आहे. यात नुकसान जनतेचे होत आहे. '


नवाब मलिक यांच्यावरील कारवाईसंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'काही कुटुंब अशी आहेत की त्यांच्यावर सारख्याच तक्रारी होतात. त्याच्यात मला काही आश्चर्य वाटत नाही. हे सुडाचे राजकारण राज्यात थांबत नाहीये. असे आरोप हे विरोधी पक्षावर झाले आहेत. '


हर्षवर्धन पाटील यांना खोचक टोला -
वरची माणसे आता खाली आली  आहेत. आमच्या सचिन सपकळच्या जागेवर काही लोक आलेत. भाजपाचे जेष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती पुणे जिल्हा नियोजन समितीवर झाली आहे. त्या जागेवर आमचा कार्यकर्ता होता, त्या जागेवर हे आले आहेत. यांना फोटोत मध्ये मध्ये डोकवायची सवय आहे, असे म्हणत माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रेय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना खोचक टोला लगावलाय. ते इंदापूर तालुक्यातील कौठळी गावात सभेत बोलत होते.