पुणे : कधीकाळी डी एस कुलकर्णी हे पुण्यातील बांधकाम व्यवसायात आघाडीचं नाव होतं. राजकीय आणि सामाजिक - सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा वावर होता. पण आता डीएसके यांच्यावर अशी वेळ आलीय की गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल येरवडा कारागृहात असल्याने त्यांना त्यांच्या मुलीच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहता आलं नाही. मुलीच्या तेराव्याच्या विधीला उपस्थित राहण्याची कशीबशी परवानगी त्यांना मिळाली आहे.


नियतीच चक्र कोणाच्या पुढ्यात काय आणून ठेवेल याचा नेम नाही. कधीकाळी पुण्यातील बांधकाम व्यवसायात ज्यांचं नाव आदरानं घेतलं जायचं, ज्यांचा पुण्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सहज वावर असायचा, ज्यांनी कधी पुण्याचा खासदार होण्याचं स्वप्न पाहात खासदारकीची निवडणूक लढवली होती, त्या डी एस कुलकर्णींना तुरुंगात असल्यानं त्यांच्या मुलीच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता येऊ नये, याला नियतीचा खेळ म्हणायचं नाही तर आणखी काय म्हणायचं.


डीएसके यांची मुलगी अश्विनी देशपांडे या मागील सहा वर्षांपासून किडनीच्या आजाराने आणि मधुमेहाने त्रस्त होत्या. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आणि तीन ऑगस्टला रात्री त्यांचं निधन झालं. मागील साडेतीन वर्षं तुरुंगात असलेल्या डीएसके यांना त्यांच्या मुलीला न शेवटचं पाहता आलं न अंत्यविधीला उपस्थित राहता आलं.


डीएसके यांनी 40 वर्षांपूर्वी जेव्हा बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा पहिली इमारत उभारली ती पुण्यातील रस्ता पेठेत. एका वाड्याच्या जागी उभारण्यात आलेल्या या इमारतीला डीएसके यांनी त्यांचं पाहिलं अपत्य असलेल्या अश्विनी यांचं नाव दिलं. तिथून डीएसके यांच्या व्यवसायाची चढती कमान सुरु झाली. पुढे अश्विनी देखील डीएसके यांच्या व्यवसायात सहभागी झाल्या. अगदी अखेरपर्यंत त्या डीएसके यांच्या व्यवसायात सहभागी होत्या.


गुंतवणूकदारचे पैसे परत न देऊ शकल्याबद्दल डीएसके, त्यांच्या पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, अनेक नातेवाईक आणि कंपनीचे अधिकारी मागील साडेतीन वर्षांपासून येरवडा कारागृहात आहेत. हजारो गुंतवणूकदारांचे दोन हजार कोटी रुपयांहून अधिक पैसे परत देऊ न शकल्याचा डीएसकेंवर आरोप आहे. हे पैसे परत करण्यासाठी डीएसकेंच्या मालमत्तांचा लिलाव सुरु आहे.


पुण्यातील चतुःशृंगी मंदिरालगत असलेला डीएसकेंचा हा आलिशान बंगला वगळता. डीएसकेंच्या इतर सर्व मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. पण वेळ अशी आलीय की कुटुंबातील बहुतेक नातेवाईक तुरुंगात असल्यानं या बंगल्यात राहण्यासाठीही कोणी उरलेलं नाही. ज्या व्यक्तीनं हजारो कुटुंबांचं घराचं स्वप्नं पूर्ण केलं त्या व्यक्तीचा स्वतःच्या कुटुंबासोबतचा मुक्काम मागील साडेतीन वर्षांपासून येरवडा कारागृहात आहे.


मुलीच्या अंत्यविधीला उपस्थित राहता न आलेल्या डीएसकेंनी किमान तेराव्याला तरी काही तासांसाठी हजर राहता यावं यासाठी न्यायालयाकडे केलेला अर्ज मान्य करण्यात आलाय. त्यामुळे येत्या 16 ऑगस्टला डीएसके काही तासांसाठी तुरुंगातून बाहेर येऊन तेराव्याच्या विधींमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. व्यवसायात एकामागोमाग एक यश संपादन करणाऱ्या डी एस केंनी पुण्याजवळ ड्रीम सिटी उभारण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांच्यासोबत असलेल्या हजारो गुंतवणूकदारांनाही दाखवलं होतं . पण आर्थिक गणितं चुकली आणि सगळंच मातीमोल झालं . जिथं कधी मायसभेचा भास व्हायचा त्या ड्रीम सिटीत सध्या पडझड होऊन गवत उगवलय. एकट्या डीएसके यांच्याच नाही तर हजारोंच्या स्वप्नाचा चुराडा झालाय.


डीएसके यांचा या सगळा प्रवास पाहिल्यानंतर शत्रूवर देखील अशी वेळ येऊ नये असं वाटल्याशिवाय राहत नाही. पण ही वेळ आणि हे प्राक्तन फक्त डीएसकेंच्या वाट्याला आलेलं नाही तर त्यांच्याकडे पैसे गुंतवणाऱ्या हजारो गुंतवणूकदारांच्या नशिबीही हेच आलंय. डीएसकेंच्या साम्राज्याच्या अस्ताबरोबरच आयुष्यभर कष्टाने कमावलेली पै न पै विश्वासाने डीएसकेंकडे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांच्या स्वप्नांचीही धूळधाण झालीय.