पिंपरी चिंचवड : सेलिब्रिटींसह सामान्यांच्या शरीरावरील टॅटू काही ना काही विचार करुनच गोंदले जातात. या टॅटूवरुन समाजात वेगवेगळ्या चर्चाही रंगतात. पण याच टॅटूमुळे पिंपरी चिंचवडमध्ये एकाची हत्या झाली आहे. मयुर मडके असं मृताचं नाव असून तो सराईत गुन्हेगार होता.


महिनाभरापूर्वी मयुर मडके याने हातावर स्वत:चं नाव आणि आडनावाचं 'एमएम' असा टॅटू गोंदला. नंतर मंगेश मोरेच्या हातावरही 'एमएम' हा टॅटू दिसला आणि इथून वादाला तोंड फुटलं. मयुर मडके आणि मंगेश मोरे या दोघांच्या नावाची आणि आडनावाची सुरुवात एमएम अक्षराने होते. पण एमएम नक्की कोणाचा या वर्चस्वावरुन वाद सुरु झाला आणि त्यामधून मयुरची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली.


दहा वर्षांपूर्वी एका मॉलमध्ये काम करताना मयुर मडके आणि मंगेश मोरेची ओळख झाली. दोघे एकाच जिल्ह्यातील असल्याने एकत्रित राहू लागले, यातून त्यांची घट्ट मैत्री झाली. पुढे दोघांनी गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं. अगदी एकमेकांसाठी जीव देण्याचीही भाषा ते करायचे. पण एकसारख्या टॅटूमुळे त्यांच्या दहा वर्षांच्या मैत्रीत फूट पडली अन् वादाचे पडसाद मयुरच्या हत्येपर्यंत पोहोचले.


हत्या करुन आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले होते. आरोपी लातूरला पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला. आरोपी सोलापूर महामार्गाने पळून जात असताना, भोसरी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन हत्या करणाऱ्या मंगेश मोरेसह सात जणांना पाटस टोलनाक्यावर बेड्या ठोकल्या आहेत.


टॅटू प्रकरण प्रकरण इथेच थांबलेलं नाही. कारण मयुर मडकेच्या साथीदारांनी सोशल मीडियावर 'वेट ऍण्ड वॉच ओन्ली, रिप्लाय फिक्स' असे धमकीचे मेसेज व्हायरल केले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणखी एखाद्याचा घात-पात होण्याआधीच हे प्रकरण तडीस न्यायला हवं.