Pune Chandani Chowk Bridge Demolition : पुण्यातील (Pune) चांदणी चौकातील (Chandani Chowk) पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीला हा पूल कारणीभूत ठरत असल्याने पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 18 सप्टेंबरला हा पूल पाडण्यात येणार आहे. पाडण्याच्या पुर्वतयारीसाठी हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. यासाठी काही पर्यायी मार्ग जाहीर केले आहे. त्यामुळे पुणेकरांना किमान दीड ते दोन किलोमीटर वळसा घालावा लागणार आहे.


काही सेंकदात पूल इतिहासात जमा होणार
पूल पाडण्यासाठी पुलाच्या भिंतींमधे स्फोटकं भरावी लागणार आहेत. त्यासाठी पुलाच्या भिंतींना ड्रीलींग करुन होल्स पाडण्याचं काम सुरु झालं आहे. स्फोटानंतर अवघ्या आठ ते दहा सेकंदांमधे हा पुल जमिनदोस्त होणार आहे. पण त्यानंतर जो राडारोडा तयार होणार आहे तो हटवण्यासाठी आठ ते दहा तास लागणार आहेत. या कालावधीत मुंबईहून - पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता द्यावा लागणार आहे. पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केलीय. ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल  (Bridge Demolish)  पाडण्यात येणार आहे. हा पूल 10 सेकंदात पाडण्यात येणार आहे. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक (Traffic) कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे


पुणेकरांसाठी पर्यायी मार्ग
नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (NDA) आणि मुळशीकडून पाषाण, बावधन, कोथरूड आणि वारजेकडे जाणारी वाहतूक नव्याने बांधण्यात आलेल्या फ्लायओव्हर क्रमांक 1 वरून सोडण्यात येणार आहे.
-एनडीए, मुळशी येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक फ्लायवे क्रमांक 7 वरून फ्लायओव्हर क्रमांक 3 मार्गे सोडण्यात येईल. इतर रस्त्यांवरील वाहतूक पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
-मुंबईहून कोथरूडकडे जाणारी वाहतूक सध्याच्या कोथरूड मार्गाने वळवण्यात येणार आहे.
-कोथरूड ते मुंबई वाहतूक कोथरूड भुयारी मार्गाने वेद विहारकडे जाईल.
-कोथरूडकडून सातारा, वारजेकडे जाणारी वाहतूक वेदविहार सर्व्हिस रोडवरील शृंगेरी मठाजवळ महामार्गावरून वळवण्यात येणार आहे.


मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला अन् मुख्यमंत्र्यांनी पूल पाडण्याचा आदेश दिला
पुण्यातील चांदणी चोकात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी असायची. यासाठी पुणेकरांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचा ताफा याच वाहतूक कोंडीत अडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेत हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार NHAI कडून पाहणी करण्यात आली आणि येत्या 18 सप्टेंबरला हा पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे.