Pune Crime News : कर्जदाराने कर्जाचे हप्ते थकवल्याने जामीनदारावर दबाव आणला आणि त्याला अटक करण्याची भीती दाखवली. या भीतीमुळे जामीनदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या नाना पेठेत सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी दोन पोलीस कर्मचार्‍यांसह कर्जदारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


राजेंद्र राऊत असं आत्महत्या केलेल्या जामीनदाराचे नाव आहे. या प्रकरणी राजेंद्र राऊत यांची कन्या वैष्णवी हिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत किरण भातलावंडे, सहायक पोलीस फौजदार भाग्यवान ज्ञानदेव निकम आणि पोलीस हवालदार सचिन रामचंद्र बरकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे हे दोघेही पोलीस कर्मचारी समर्थ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. 


किरण भातलवंडे यांनी कर्ज घेतले होते. तर राजेंद्र राऊत हे त्याला जामीनदार होते. आरोपी किरण याने रघुवीर बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांच्याकडून टाटा सुमो वित्त ही गाडी घेतली होती. मात्र त्यांनी कर्जाचे हप्ते भरले नव्हते. त्यामुळे सहाय्यक पोलीस फौजदार भाग्यवान निकम आणि पोलीस हवालदार सचिन बरकडे हे राऊत यांच्याकडे वारंवार कोर्टाचे वॉरंट बजावण्यासाठी येत होते. तसेच त्यांना अटक करण्याची भीती दाखवत होते. सातत्याने त्यांचा मानसिक छळ करत होते. हा छळ पाहून त्यांनी अनेकदा किरण यांच्याकडे कर्जाविषयी विचारणा केली. मात्र किरण यांना जुमानत नव्हते. राऊत यांना वारंवार अटक करण्याची धमकी देण्यात येत होती. अटक होऊ नये यासाठी त्यांनी वेळोवेळी सात ते आठ हजार रुपये दिले होते. दरम्यान या सर्व त्रासानंतर राऊत यांनी किरण याला कर्ज फेडण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी कर्ज फेडण्यास नकार देऊन धमकी दिली होती. त्यानंतर राजेंद्र यांनी या सर्व त्रासाला कंटाळून सोमवारी सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.


पोलिसांनीच त्रास दिल्याने खळबळ


किरण भातलावंडे, सहायक पोलीस फौजदार भाग्यवान ज्ञानदेव निकम आणि पोलीस हवालदार सचिन रामचंद्र बरकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे पोलीस समर्थ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. किरण यांच्यासोबत कर्जासाठी धमकवण्यात या दोन पोलिसांचा देखील समावेश होता. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. पोलीस पुढचा तपास करत आहे.