पुणे : स्वयंपाकिणीनं सोवळं मोडल्याची तक्रार करणाऱ्या डॉ मेघा खोले यांनी एक पाऊल मागे येत तक्रार मागे घेतली आहे. डॉ. मेधा खोले सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आज शनिवारी संध्याकाळी दाखल झाल्या आणि त्यांनी तक्रार मागे घेतली आहे.
हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी गौरी-गणपतीदरम्यान सोवळ्यातील स्वयंपाक करण्यासाठी ब्राम्हण असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी निर्मला कुलकर्णी या महिलेविरोधात सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
डॉ. खोले यांनी केलेल्या तक्रारीविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पुणे वेधशाळेच्या कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात आली. तसंच शेतकरी कामकार पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही निदर्शनं केली.
मेधा खोलेंनी मराठा महिलेविरोधात केलेल्या जातीवाचक व्यवहाराचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
दरम्यान या प्रकारानंतर आयएमडी कार्यालयाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून मेधा खोले यांनी पोलिसात तक्रार केली होती.
काय आहे प्रकरण?
मेधा खोले यांना गौरी-गणपतीदरम्यान सोवळ्यातील स्वयंपाक करणारी सुवासिनी ब्राम्हण महिला हवी होती. 2016 मध्ये निर्मला कुलकर्णी नावाची एक स्त्री त्यांच्याकडे आली. आपल्याला कामाची गरज असल्याचं सांगत त्यांनी खोले यांच्याकडे स्वयंपाकाचं काम मागितलं. त्यावेळी खोले यांनी निर्मला यांच्या घरी जाऊन ही महिला ब्राम्हण आहे की, नाही याची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी तिला स्वयंपाकाचं काम दिलं.
नुकताच पार पडलेल्या गौरी-गणपतीतही निर्मला यांनीच मेधा खोले यांच्या घरी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला होता. पण काल (बुधवार) निर्मला ही ब्राम्हण नसल्याची माहिती खोले यांना समजली. त्यामुळे पुन्हा शाहनिशा करण्यासाठी खोले या निर्मला यांच्या घरी गेल्या. त्यावेळी आपलं नाव निर्मला यादव असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दोघींमध्ये बराच वाद झाला. यावेळी आपल्याला महिलेनं दमदाटी आणि शिवीगाळ केल्याची तक्रार मेधा खोले यांनी सिंहगड पोलिसात केली आहे.
संबंधित बातम्या
सोवळं मोडल्यानं स्वंयपाकी महिलेवर गुन्हा, पुण्यातील धक्कादायक प्रकार
चहूबाजूच्या टीकेनंतर डॉ. मेधा खोलेंची स्वयंपाकिणीविरुद्धची तक्रार मागे
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
09 Sep 2017 06:55 PM (IST)
हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी गौरी-गणपतीदरम्यान सोवळ्यातील स्वयंपाक करण्यासाठी ब्राम्हण असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी निर्मला कुलकर्णी या महिलेविरोधात सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -