पिंपरी चिंचवड : पर्यटनस्थळांचा आनंद लुटायला जाणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. मतदान केल्याचा पुरावा हॉटेल व्यावसायिकांना दाखवल्यास लॉजिंगमध्ये 20 टक्के, तर रेस्टॉरंटमध्ये 15 टक्क्यांच डिस्काऊंट पर्यटकांना मिळणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने हॉटेल व्यावसायिकांना सोबत घेऊन हा अनोखा उपक्रम राबवला आहे.


सुट्टी म्हटलं की उच्च शिक्षित तरुण वर्ग लोणावळा-खंडाळासारखे पर्यटनस्थळ गाठतो. मग ती सुट्टी अगदी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिली असली, तरी तरुण वर्ग याकडे पाठ फिरवतो. परिणामी मतदानाच्या टक्केवारीवर याचा मोठा परिणाम होतो. हीच गंभीर बाब लक्षात घेता निवडणूक आयोगानं एक शक्कल लढवली आहे.

महापालिका, जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून पर्यटनाचा आनंद लुटायला जाणाऱ्यांना लॉजिंग आणि रेस्टॉरंटमध्ये डिस्काऊंट देण्याची घोषणा केली आहे.

पर्यटकांनी मतदान केल्याचा पुरावा हॉटेल व्यावसायिकांना दाखवल्यास लॉजिंगमध्ये 20 टक्के तर रेस्टॉरंटमध्ये 15 टक्के डिस्काऊंट दिला जाणार आहे. 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान या उपक्रमाचा लाभ पर्यटकांना घेता येणार आहे.

या उपक्रमातून मतदानाचा टक्का वाढण्यात हातभार लागणार असल्यानं आणि वाढत्या मतदानातून योग्य उमेदवार निवडला जाणार असल्यानं लोणावळा-खंडाळामधील शंभरहून अधिक हॉटेल व्यावसायिकांनी यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पर्यटनस्थळी राहण्यात 20 टक्के तर जेवणामध्ये 15 टक्के डिस्काऊंट मिळणार असल्यानं, पर्यटकांनी देखील मतदान करून याचा लाभ घेऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून नवनवे उपक्रम अवलंबले जात आहेत. हे जितकं कौतुकास्पद आहे तितकंच निंदनीय देखील. कारण खरं तर मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी अशी प्रलोभनं दाखवायची वेळ यायलाच नको होती. ही वेळ येण्यामागं नेमकं अपयश कुणाचं. निवडणूक आयोग, राजकारणी की मतदारांच हा विचार प्रत्येकानं करायलाच हवा.