मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये इनकमिंग वाढण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच त्याला पूरक अशा राजकीय घडामोडीही घडताना दिसत आहेत. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटीलही शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा होती. पण या बातम्या निराधार आणि खोडसाळ असल्याचं सांगत दिलीप वळसे पाटलांनी ही चर्चा फेटाळळी. 


आपण शरद पवारांना भेटणार असल्याच्या बातम्या निराधार आणि खोडसाळ आहेत. माध्यमांमध्ये याबाबत सुरू असलेल्या बातम्या या चुकीच्या आहेत अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटलांनी एबीपी माझाला दिली. सध्या आपण मतदारसंघात दौऱ्यावर असून दिवसभर ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेत आहोत अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटलांनी दिली. 


दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांची तयारी सुरू


दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत जाणं पसंत केलं. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वळसे पाटलांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांनी वळसे पाटलांच्या आंबेगाव या मतदारसंघात दोन सभा घेतल्या होत्या. त्यानंतर शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनाही वळसे पाटलांच्या मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळालं होतं. 


आता आंबेगावमधून वळसे  पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम यांनी तयारी सुरू केली असून त्याला शरद पवारांनी बळ दिल्याचं दिसतंय. त्यामुळे वळसे पाटलांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे. 


शरद पवारांनी त्यांना सोडून गेलेल्या काही नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पराभव करायचाच अशा चंग बांधल्याचं दिसतंय. त्यात लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहापैकी आठ जागांवर घवघवीत यश मिळालं. तर अजित पवारांना फक्त एकच खासदार निवडून आणता आला. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटातील अनेक नेते हाती तुतारी घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. 


बबन शिंदे आणि विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला


माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्याच्या आदल्या दिवशीच सोलापूरमधील राजन पाटील यांनीदेखील पवारांची भेट घेतल्याने सोलापुरातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांनीदेखील शरद पवारांची भेट घेतली. बबनदादा शिंदे आणि विलास लांडे हे दोन्ही नेते अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र, त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. 


ही बातमी वाचा :