पुणे : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांचे खातेवाटपही झाले असून सर्वच मंत्र्यांनी पदभार घेऊन कामाकाजाला सुरुवातही केल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये वाद सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसहून महाराष्ट्रात परतल्यानंतर पालकमंत्रीपदाचा वाद मिटणार असल्याचे समजते. दरम्यान, राज्याचे क्रीडामंत्री म्हणून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray bharne) यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यातच, आज पुणे जिल्ह्यातील एका क्रीडाप्रसंगी व्हॉलिबॉल खेळताना मंत्री दत्तात्रय भरणे यांचा तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळल्याचे दिसून आले. भरणेमामांचा हा व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाला असून व्हॉलीबॉल मैदानातील इतर सहकाऱ्यांनी लगेचच त्यांना सावरल्याचे पाहायला मिळाले.
राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंचा हॉलीबॉल खेळताना तोल गेला अन् ते जमिनीवर कोसळले. यावेळी भरणे मामा डोक्याला दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावले. हॉलीबॉलच्या लोखंडी पोलवर त्यांचं डोकं आपटण्याची शक्यता होती, मात्र भरणेंनी लोखंडी पोलवर धडकण्याच्या आधी स्वतःला सावरलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पुण्याच्या मावळमध्ये एका महाविद्यालयातील क्रीडा संकुलाचे उद्घाटन क्रीडामंत्री भरणेंच्या हस्ते झाले. त्यावेळी येथील खेळाडू व क्रीडा शिक्षकांसमवेत विविध खेळांचा आनंद क्रीडामंत्र्यांनी घेतला. दरम्यान, येथे हॉलीबॉल खेळण्याची वेळ आली तेंव्हा ते स्वत: मैदानात उतरले होते. व्हॉलीबॉलच्या मैदानात सुरुवातीला भरणेंनी हॉलीबॉल योग्यरीत्या टोलवला. पण, विरोधी बाजूनं टोलवलेला हॉलीबॉल नेटच्या पुढं आला अन् तो टोलवताना भरणेंचा तोल जाऊन ते जमिनीवर कोसळले. यात त्यांना मुक्कामार ही लागला आहे. दरम्यान, त्यांनी वेळीच स्वत:ला सावरल्याने राज्याचे क्रीडामंत्री फीट असल्याचेही पाहायला मिळालं.
सुरपाट्या खेळल्याचाही व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, कोरोना कालवधीनंतर मतदारसंघातील एका गावात दत्तात्रय भरणे यांनी मंत्री असताना सुरपाट्या खेळल्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. बालपण जगायला मिळणे ही प्रत्येकाचीच ईच्छा असते. हा मोह मलापण आवरला नाही. कोरोनाच्या तणावपूर्ण वातावरणामध्ये काम करत असताना निमगाव केतकी येथे सुरपाट्या खेळण्याचा आनंद घेतला. हा आनंद मला महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा बघायचा आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले होते.