मुंबई : महाराष्ट्रातील जळगाव (Jalgoan) जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी पाचोरा स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेने घाबरून काही प्रवाशांनी चेन पुलिंग करून ट्रेन थांबवली आणि खाली उतरताना समोरील ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत ते सापडले. या दुर्दैवी घटनेत आत्तापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण रुग्णालयात उपचार घेत आहेत. या भीषण दुर्घटनेत (Accident) भिवंडीतील जयघडी आणि पुण्यातील (Pune) विश्वकर्मा कुटुंबीयांवर शोककळा पसरली. या दोन्ही कुटुंबातील 9 सदस्य नेपाळवरून लखनऊला आले आणि तिथून पुष्पक एक्सप्रेसने भिवंडीकडे येत होते. मात्र, रस्त्यात झालेल्या अपघातामुळे या कुटुंबातील 4 सदस्यांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जयकला जयगडी (60 वर्ष) या नेपाळ येथील चाल्स गावच्या मूळ निवासी होत्या. कुटुंब चालवण्यासाठी त्यांचा मुलगा प्रथम पुण्यात आला आणि त्यानंतर ते भिवंडीतील अंजुर फाटा येथील सीतामाता सोसायटीमध्ये वॉचमनचे काम करत आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह भागवत होते. त्यामुळे, आपल्या नातवंडांना भेटण्यासाठी निघालेल्या जयकला यांना नातवांना पाहायला मिळालंच नाही. जयकला या दमा आणि हृदयविकाराच्या त्रासाने त्रस्त असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्या पहिल्यांदा भिवंडीत येणार होत्या आणि आपल्या नातवंडांना त्या पहिल्यांदा भेटणार होत्या. त्यांनी आतापर्यंत आपल्या नातवंडांना मोबाईल फोनद्वारे तसेच व्हिडिओ कॉलद्वारेच संपर्क केला होता. परंतु, त्या आता थेट प्रत्यक्षात आपल्या नातवंडांना भेटणार होत्या परंतु वेळ मिळत नसल्याने त्यांनी आपल्या नातवंडांना या घटनेच्या आधी कॉल केला आणि व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या नातवंडांना पाहिलं होतं. व्हिडिओ कॉल कट झाला आणि थोड्या वेळातच काळाने झडप घातली.
पुष्पक ट्रेनमध्ये आगीची अफवा पसरली आणि सर्वजण ट्रेनमधून बाहेर पडले आणि समोरून येणाऱ्या ट्रेनचा धडकेत त्यांचा मृत्यू झालाय. आपली आजी आपल्याला भेटणार याचा आनंद भिवंडीतील जयगडी कुटुंब साजरा करत असताना अचानक एक फोन आला, ज्यामध्ये त्यांच्या आजीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि जयगडी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. तर दुसरीकडे याच कुटुंबाबरोबर नेपाळ येथील कुच्ची कलिकास्थान मधील विश्वकर्मा कुटुंब पुण्यातील इंद्रायणी नगर सद्गुरु कंपनीत काम करतं होते. या दुर्घटनेतील मयत नन्ना विश्वकर्मा (55) हे या कंपनीत काम करायचे व मिळालेल्या रकमेतून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचे. मात्र, पत्नी मैश्रा विश्वकर्मा (45) या पाथरीच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांना देखील उपचारासाठी आणण्यात येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा हेमंत विश्वकर्मा (वय 11) वर्ष हा देखील येत होता तसेच त्यांच्या कुटुंबीयातील इतर 3 जण असे विश्वकर्मा कुटुंबातील एकूण 6 जण येत होत. मात्र, रेल्वे अपघाताच्या दुर्घटनेत नन्ना विश्वकर्मा 55, मैश्रा विश्वकर्मा 45 व हेमंत विश्वकर्मा वय 11 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामधील मयत मैश्रा विश्वकर्मा व हेमंत विश्वकर्मा हे पहिल्यांदाच पुण्यात येत होते. मैश्रा विश्वकर्मा याही आपल्या नातवंडांना पहिल्यांदाच भेटणार होत्या परंतू त्यांना भेटण्याच्या आधीच या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
नातवांना आजीची भेट झालीच नाही
या दोन्ही कुटुंबातील एकूण नऊ सदस्य लखनऊवरून निघाले होते परंतु जयगडी कुटुंबातील एक व विश्वकर्मा कुटुंबातील तीन असे एकूण नऊ पैकी 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जयगडी व विश्वकर्मा कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असून हे प्रथम भिवंडीत येणार होते आणि त्यानंतर विश्वकर्मा कुटुंब पुण्याला जाणार होते. त्यासाठी सर्व नातवंड याठिकाणी जमा देखील झाले होते. आपल्या आजीची वाट बघत होते, परंतू त्यांच्या आजीची मृत्यूची बातमी आल्याने आजीची भेट राहिली ती राहिलीच, आता या नातवांना आपल्या केवळ आजीच्या आठवणींनाच सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे.
हेही वाचा
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास