पुणे : घरात पेस्ट कंट्रोल करणं पुण्यातील दाम्पत्याच्या जीवावर बेतलं आहे. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात योग्य ती खबरदारी न घेतल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला. बिबवेवाडी परिसरातील गणेशविहार सोसायटीमध्ये बुधवारी (12 फेब्रुवारी) ही घटना घडली आहे.  अविनाश मजली (वय 64 वर्ष) आणि अपर्णा मजली (वय 54 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.


या दाम्पत्याने मंगळवारी (11 फेब्रुवारी) घरात पेस्ट कंट्रोल केलं आणि त्यानंतर ते नातेवाईकांच्या घरी गेले होते. संध्याकाळी हे दाम्पत्य संध्याकाळी घरी परतलं. मात्र पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घ्यावी लागणारी खबरदारी मात्र त्यांनी घेतली नाहीत. त्यांनी घराची दारं-खिडक्या उघडली नाहीत. पंखा चालू न करता टीव्ही पाहत बसले. काही वेळाने दोघांनाही चक्कर आली आणि ते खाली पडले.

रात्री साडेसातच्या सुमारास त्यांची मुलगी कामावारुन परत आली तेव्हा दोघेही बेशुद्धवस्थेत आढळले. शेजाऱ्यांच्या मदतीने मुलीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मागील एक ते दोन वर्षात पुण्यामधीलच भारती विद्यापीठ आणि सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशाप्रकारच्या घटना घडल्या होत्या. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर आवश्यक खबरदारी न घेतल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. हे दोन्ही तरुण मूळचे बीडमधील होते. नोकरीसाठी ते पुण्यात आले होते.


तर सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशीच घटना घडली होती. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर काही वेळाने घरात येऊन झोपलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यातील नऊ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या


पुण्यात दोघा तरुणांचा मृत्यू, तीन दिवसांपूर्वी रुममध्ये पेस्ट कंट्रोल


घरातलं पेस्ट कंट्रोल जीवावर, पुण्यात नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू