नवी दिल्ली : भाजपच्या पराभवाची मालिका सुरु झाली आहे, ती थांबेल असं वाटत नाही. जाणीवपूर्वक धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला आहे. भाजपला पर्याय देणाऱ्या पक्षाला जनतेने कौल दिला. केजरीवालच जिंकतील असा कौल होता. त्यामुळे निकालाचं मला वैयक्तिकरित्या आश्चर्य वाटत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं.


दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला कौल दिला. निकालात भाजप आणि आपमध्ये मुख्य लढत झाली. त्यात आम आदमी पक्षाने 60 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप आठ जागी आघाडीवर आहे. याशिवाय काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

Delhi Election Results | महाराष्ट्रातून नेत्यांची रसद पुरवूनही दिल्लीत भाजप अपयशी


धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला : पवार
या निकालावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, "मला वैयक्तिकरित्या आश्चर्य वाटत नाही. मी दिल्लीत राहतो. केजरीवालच जिंकतील असं सगळेच सांगायचे. हा निकाल दिल्लीपुरता मर्यादित नाही. भाजपला अहंकार भयंकर होता. मोदी आणि शाह यांच्याबाबत अस्वस्थता सत्ताधारी पक्षातही आहे. संसदेच्या सदस्यांमध्ये दहशत आहे. हीच नाराजी ती मतांच्या रुपात व्यक्त झाली. याआधी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपचा पराभव झाला. भाजपच्या पराभवाची मालिका सुरु झालीय, ती थांबेल असं वाटत नाही. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला. गोळ्या घाला, मारा, अशाप्रकारच्या प्रचाराला उत्तर म्हणून भाजपचा पराभव झाला आणि दिल्लीकरांनी केजरीवालांना कौल दिला."

Delhi Election Results | भाजपचा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला : अनिल परब


राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : पवार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आझाद मैदानातील सभेत दगडाचं उत्तर दगडाने आणि तलवारीचं उत्तर तलवारीने दिलं जाईल, असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याल्या या निकालाचा काही इशारा आहे का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, "याची गांभीर्याने नोंद घ्यायची नसते. राज्याच्या राजकारणावर ज्यांच्यामुळे परिणाम होऊ शकतो, अशांची दखल घ्यायची असते. काहीतरी बोलून गेले. काही लोक काहींची भाषणं ऐकायला येतात. काहींची भाषणं बघायला येतात. अशा प्रकारची भाषणं होत असतील तर ती एक करमणूक असते."