पुणे : पेस्ट कंट्रोल केल्यानंतर काही वेळाने घरात येऊन झोपलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील नऊ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. सिंहगड रोड परिसरातील सोमवारी मध्यरात्रीची ही घटना आहे.


सार्थक डोंगरे असं मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. संदीप डोंगरे हे पत्नी आणि दोन मुलांसह सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर परिसरात राहतात. संदीप डोंगरे हे स्वतः पेस्ट कंट्रोलची कामे करतात. ढेकून झाल्यामुळे त्यांनी सोमवारी घरात पेस्ट कंट्रोल केलं होतं.

यानंतर संदीप डोंगरे पत्नी आणि मुलांसह बाहेर पडले होते. त्यानंतर रात्री घरी येऊन झोपी गेले. मध्यरात्री या सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने सकाळी शेजारी आणि नातेवाईकांनी सिंहगड रोड परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं.

या सर्वांवर उपचार सुरू असताना सार्थक डोंगरे या मुलाची प्रकृती अधिक खालावल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. तर संदीप डोंगरे, त्यांच्या पत्नी आणि साहील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे सिंहगड रोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिंहगड रोड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.