पुणे : 14 एप्रिलनंतर 3 मेपर्यंत वाढवलेला लॉकडाऊनचा कालावधीही आता संपत आला आहे. लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या करणं आवश्यक आहे. जितक्या जास्त चाचण्या होतील, तितक्या जास्त कोरोनाच्या संक्रमणाला नियंत्रित करण्यासाठी बळ मिळेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासंदर्भातील दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतंच केंद्राने महाराष्ट्राला कोरोनाग्रस्त शोधण्यासाठी ‘पूल टेस्टिंग’ करायला परवानगी दिली. ‘पूल टेस्टिंग’ म्हणजे काय? आणि त्याचा फायदा कसा होईल, यासंदर्भात मूळचे नाशिक येथून आणि अमेरिकास्थित व्हायरॉलॉजिस्ट डॉ. धनंजय नावंदर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.


‘पूल टेस्ट’ म्हणजे काय? ही चाचणी कशाप्रकारे केली जाते?


पूल टेस्टिंग कशी केली जाते, हे समजून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला नॉव्हेल कोरोना व्हायरसचा म्हणजे SARS-CoV2 चा संसर्ग झाला आहे का, हे शोधण्याची चाचणी कशी केली जाते हे समजून घेऊया. त्या व्यक्तीच्या नाक किंवा घशातून स्वॅबचा नमुना गोळा केला जातो. त्यानंतर टेस्टिंग किटचा वापर करुन त्यामध्ये SARS-CoV2 चं महत्वाचं घटक किंवा त्याचे जेनेटिक मटेरियल म्हणजेच त्याचे रायबो न्युक्लिक अॅसिडचे (RNA) अस्तित्व आहे का, हे तपासलं जातं. ‘रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस पॉलिमरेस चेन रिअॅक्शन’ (आरटीपीसीआर) या प्रक्रियेने SARS-CoV2 चा आरएनए शोधला जातो.


ही चाचणी करण्याच्याही वेगवेगळ्या पायऱ्या आहेत आणि त्यासाठी प्रशिक्षित व्यक्तीची गरज असते. टेस्टच्या प्रत्येक पायरीसाठी ठराविक किटची गरज असते आणि त्याचसोबत विशेष उपकरणंही लागतात. पण आपल्याकडे फक्त हे किट आणि उपकरणांचीच कमतरता नाहीये तर ही टेस्ट अचूकपणे करु शकणाऱ्या प्रशिक्षित लोकांचीही कमतरता आहे. एका नुमन्याच्या तपासणीसाठी या सगळ्या पायऱ्या पार कराव्या लागतात. त्यामुळे पूल टेस्टिंग फायदेशीर ठरू शकते.


Coronavirus | राज्यात आज 811 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 7628


पूल टेस्टमध्ये नेमकं काय केलं जातं? तर यामध्ये जास्तीत जास्त 5 व्यक्तींपासून गोळा केलेल्या स्वॅबचा एक नमुना बनवला जातो आणि त्या नमुन्याचं वर सांगितलेल्या पद्धतीने परीक्षण केलं जातं. आणि विशेष म्हणजे 5 चाचण्या वापरण्या ऐवजी एकच चाचणी वापरली जाते. जर त्या नमुन्याची चाचणी निगेटिव्ह आली, तर ते पाचही जण कोरोना निगेटिव्ह आहेत, असं म्हणू शकतो. यामुळे त्या 5 जणांची वेगवेगळी चाचणी करण्यासाठी लागणारा वेळ, टेस्टिंग किट आणि परिश्रम वाचतील. जर या नमुन्याची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर ज्या 5 जणांचे नमुने गोळा केले आहेत, त्यांच्यातील कोण कोण कोरोना पॉझिटिव्ह आहे हे शोधण्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी चाचणी केली जाते.



ही पद्धत वापरुन आपण चाचण्यांचा वेग वाढवू शकतो आणि सध्या उपलब्ध असलेल्या मोजक्या साधनांमध्ये जास्तीत जास्त लोकांची चाचणी कमी दरामध्ये करु शकतो. पूल टेस्टिंगसंदर्भात आयसीएमआरने गाईडलाईन्स दिल्या आहेत. ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह येण्याचा दर हा 2-5 टक्के आहे, तिथेच पूल टेस्टिंग केलं जावं, असं आयसीएमआर सांगतं. तर ज्या भागात पॉझिटिव्ह येण्याचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे पूल टेस्टिंग टाळावं असंही आयसीएमआरने सांगितलं आहे. विशेष म्हणजे जेव्हा एचआयव्ही या व्हायरसने संपूर्ण जगाला ग्रासले होतं, तेव्हाही पूल टेस्टिंगचा वापर केला गेला होता.


लॉकडाऊनच्या उर्वरित काळात पूल टेस्टिंग प्रभावी साधन ठरू शकेल का?


जसजशी टेस्टिंग किट्सची उपलब्धात वाढते आहे, तसतशी भारतामध्ये दरदिवशी होणाऱ्या चाचण्यांमध्ये वाढ होते आहे. पण तरीही आपल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये या चाचण्यांचं प्रमाण हे अत्यल्प आहे. इटलीने 10 लाख लोकांच्या मागे सुमारास 28 हजार चाचण्या केल्या आहेत. तर अमेरिकेमध्ये 10 लाखांमध्ये सुमारास 15 हजार चाचण्या झाल्या आहेत. भारतामध्ये हे प्रमाण 10 लाखांमध्ये फक्त 400 च्या सुमारास आहे. सध्या आपल्याकडे लक्षणं असलेले आणि हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असलेल्यांच्या चाचण्या करण्यावर भर दिला जातोय. पण या साथीवर नियंत्रण मिळवण्याचा एकमेव प्रभावी मार्ग म्हणजे संसर्ग झालेल्या जास्तीत जास्त लोकांना शोधणे, त्यांचे टेस्ट करणे आणि लक्षणं गंभीर असल्यास उपचार करणे. त्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करणं हा एकमेव पर्याय आहे. अशा परिस्थितीमध्ये वेळ, खर्च आणि संसाधनांची उपलब्धता या सगळ्या दृष्टीकोनांतून पूल टेस्टिंग उपयोगी ठरेल. 2-5 टक्के पॉझिटिव्ह रेट असलेल्या भागांमध्येच ही टेस्टिंग केली जावी या आयसीएमआरच्या सूचनेचं पालन करुनच पूल टेस्टिंग केली जावी. डॉक्टर, नर्सेस, हॉस्पिटलचा स्टाफ, पोलीस यांसारख्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांची चाचणी होणं खूप गरजेचं आहे.


...तर, केंद्रातील अर्थव्यवस्थेला राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत; शरद पवार यांचे पंतप्रधानांना पत्र


भारताच्या लोकसंख्येचा विचार करता चाचणीची कोणती पद्धत जास्त फायदेशीर ठरेल?


आयसीएमआरच्या गाईडलाऊन्स अंमलात आणून बहूतांश भागांमध्ये पूल टेस्टींग केलं जाऊ शकते. यामुळे टेस्टिंग किटची बचत होईल आणि ज्या भागांमध्ये संसर्गाचा दर जास्त आहे त्या भागांसाठी ते उपलब्ध राहतील. जा भागात संसर्गाचा दर हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे वैयक्तिकरित्या आरटीपीसीआर टेस्ट केली जाऊ शकते. तसंच विश्वासार्ह असलेली अॅन्टिबॉडी टेस्ट किट उपलब्ध व्हायला पाहिजेत आणि अत्यावश्यक सेवांमधल्या कर्मचाऱ्यांच्या चाचणीला प्राधान्य द्यायला हवं. त्याचसोबत अॅन्टिबॉडी टेस्टच्या माध्यामातून प्लाज्मा थेरपीसाठीचे डोनर सापडणंही सोपं होईल.


कोरोनाच्या साथीच्या या टप्प्यापर्यंत प्रत्येक देशांत किती चाचण्या व्हायला पाहिजे होत्या?


प्रत्येक देशाची लोकसंख्या आणि तिथल्या लोकांची जीवनशैली वेगळी आहे. त्यामुळे हा आकडा प्रत्येक देशासाठी वेगळा ठरू शकतो . याचसोबत या व्हायरस बद्दल आपल्याला अजूनही पुरेशी माहिती नाही. जगभरातील बरेच संशोधन समुदाय या विषाणूच्या अभ्यासावर केंद्रीत आहेत. तासंतास आपण या विषाणूबद्दल काहीतरी नवीन शिकत आहोत. म्हणूनच, शक्य तितक्या सावध राहणे फायदेशीर ठरेल. जर्मनी, तैवान, आईसलॅंड आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांनी कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलं. त्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या हे एक महत्त्वाचं कारण त्यामाग आहे. आपण या सगळ्यांच्या तुलनेत खूपच मागे आहोत.


आईसलॅंडमध्ये 10 लाखांमध्ये सुमारे 1 लाख 35 हजार चाचण्या


जर्मनीत 10 लाखांत सुमारे 25 हजार चाचण्या


तैवानमध्ये 10 लाखांत सुमारे 25 हजार चाचण्या


दक्षिण कोरियात 10 लाखांत सुमारे 12 हजार


भारत १० लाखांत सुमारे 400


यामुळे आपल्याकडची चाचण्यांची संख्या वाढणं खूप गरजेचं आहे.