पुणे : आपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवन मांडणारे ज्येष्ठ साहित्यकार झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. उत्तम बंडू तुपे त्यांच्या अतिशय गाजलेल्या 'झुलवा' कादंबरीमुळे झुलवाकार म्हणून ओळखले जात .शिवाय त्यांच्या इतरही अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळालेआहेत . 'आंदण' या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. 'काट्यावरची पोटं ' या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार मिळाला होता.झुलवा कादंबरीलाही राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी ,भसम, चिपाड, इंजाल, झावळ, माती आणि माणसं या कादंबऱ्याही त्यांच्या विशेष गाजल्या होत्या.

ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी त्यांच्या 'झुलवा'कादंबरीवर साकारलेल्या नाटकात अभिनेते सयाजी शिंदे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी भूमिका केल्या होत्या.या दोघांचा अभिनयाचा प्रवास येथूनच सुरु झाल्याचे बोलले जाते.

लेखक उत्तम तुपे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाखांची मदत

गेल्या अनेक महिन्यापासून ते पक्षाघातामुळे आजारी होते.त्यांची पत्नी जिजा यांचाही काही महिन्यापूर्वीच पक्षाघातामुळे मृत्यू झाला होता.उत्तम तुपे यांनाही त्रास वाढल्यामुळे 2 दिवसांपूर्वी जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.आज अखेर झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुलं आहेत.

उत्तम बंडू तुपे यांची साहित्य संपत्ती

कादंबरी, कथा, नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील तब्बल 52 पुस्तके उत्तम तुपेंच्या नावावर आहेत. झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं, काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती ही त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांपैकी काही नावं. झुलवा ही जोगतिणींच्या आयुष्यावरील कांदबरी लिहिण्यासाठी ते स्वतः वेष बदलून जोगतीण बनले आणि जोगतिणींच्या वाट्याला येणारे अनुभव त्यांनी कागदावर उतरवले.

भस्म या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा तर काट्यावरची पोटं या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य सरकारचा साहित्य सर्वोत्कृष्ट आत्मचरित्रासाठीचा पुरस्कारही मिळाला आहे. तिसरीपर्यंत शिकलेल्या तुपेंनी लिहलेली पुस्तके विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवडली गेली आहेत.

उत्तम बंडू तुपे यांच्या बिकट यांच्या हलाखीची परिस्थिती 'एबीपी माझा'ने जगासमोर आणल्यानंतर त्यांना विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरु झाला होता. तत्कालीन राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी पुण्यातील त्यांच्या घरी भेट देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाखांची मदत केली होती.  त्याआधी मातंग समाजातर्फे उत्तम बंडू तुपे यांना एक लाख रुपयांची मदत केली होती.  त्यानंतर पुण्यातील ज्या वाकडेवाडी भागातील झोपडीवझा घरात बंडू तुपेंच सगळं आयुष्य गेलं त्याच ठिकाणी त्यांच्यासाठी घर देखील बांधून दिलं गेलं होतं.  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उत्तम बंडू तुपेंना घर हस्तांतरीत केलं होतं.

प्रख्यात लेखक उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्यातील अस्वस्थ संध्याकाळ | स्पेशल रिपोर्ट | पुणे | एबीपी माझा