एक्स्प्लोर
शिवसेनेच्या प्रचार पुस्तिकेवर काँग्रेसचे नेते

पुणे : मुंबई पाठोपाठ शिवसेनेने पुण्यातही भाजपविरोध हीच महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवली आहे. पुणे शिवसेनेतर्फे प्रचार पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या प्रचार पुस्तिकेत व्यंगचित्रांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आण माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या प्रतिक्रिया छापण्यात आल्या असून, त्यांचे फोटोही छापण्यात आले आहेत. नोटाबंदीमुळे लोकांना झालेला त्रास, महागाई या मुद्यांवरुन भाजपवर हल्ला चढवण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रचार पुस्तिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल एक चकार शब्दही काढण्यात आलेला नाही. उलट नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबाबत ज्या अर्थतज्ज्ञांची मते आणि फोटो या पुस्तिकेत छापण्यात आले आहेत, त्यामध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा समावेश आहे. शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष विनायक निम्हण यांनी या पुस्तिकेची निर्मीती केली आहे. पुण्यातील प्रत्येक प्रभागात या पुस्तिकेचं वाटप करण्यात येणार आहे. या पुस्तिकेच्या शेवटच्या पानावर शिवसेनेच्या त्या त्या प्रभागातील उमेदवारांची माहिती फोटोसह छापण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा भाजपविरोध प्रत्येक प्रभागात पोहचणार आहे.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली






















