Pune Bypoll election कसब्यात मतदान झाल्यानंतरही आरोप प्रत्यारोप सुरुच असल्याचं दिसत आहे. कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री आठ वाजेपर्यंत पैसे वाटत फिरत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरही पोलिसांच्या उपस्थितीत फिरत होते, असा आरोप कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. 


रवींद्र धंगेकर म्हणाले की, "प्रचार संपल्याने मी उपोषण केलं त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र भाजपचे लोक रात्री आठ वाजेपर्यंत प्रचार करत होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा करु नये. मुख्यमंत्र्यांनी ज्या घरात पैसे वाटले, ते घर माझं आहे. पण, निवडणूक यंत्रणाही भाजपचं कार्यालय झालं आहे." 


रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध भाजपची तक्रार


उपोषण करुन आचारसंहितेचा भंग केल्यामुळे कॉंग्रेसचे कसबा पेठचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक कार्यलयात जाऊन तक्रार केली होती. त्यानुसार धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता पुणे पोटनिवडणुकीचा प्रचार संपला. शेवटच्या दिवशीही दोन्ही पक्षाने प्रचार जोरात केला. भाजपचे हेमंत रासने यांचा प्रचार करण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो केला. यावेळी अनेकांनी गर्दी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धडाकेबाज भाषण केलं. यावर धंगेकरांनी आरोप केला. मुख्यमंत्र्यांचं भाषण संध्याकाळी पाच नंतरही सुरुच होतं. त्यावेळी आचारसंहितेचा भंग झाला नाही आणि पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्यामुळे उपोषण केल्याने लगेच आचारसंहितेचा भंग झाला, असं भाजपचं म्हणणं आहे. असं असेल तर आधी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली तर मी त्यांना स्पष्ट सांगेन की आधी भाजपला नोटीस द्या आणि मग मला द्या, असा हल्लाबोल धंगेकरांनी केला होता.


धंगेकरांनी का केलं होतं उपोषण?


भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केले असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना कारवाईचं आश्वासन दिल्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं असं त्यांनी सांगितलं आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस बाकी असताना पुण्यात मागील पैशांचा पाऊस पडत आहे. हे सगळं पोलिसांसमोर घडत आहे. ही लोकशाहीची हत्या आहे, असं ते म्हणाले होते.